Vidyadhar Joshi: जेष्ठ मराठी अभिनेते विद्याधर जोशी हे आजपर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांत झळकले आहे. पण आयुष्यात सगळं काही व्यवस्थित सुरू असताना अचानक त्यांना गंभीर आजाराचं निदान झालं. या आजारामुळेच ते अनेक महिन्यांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर होते. त्यांना नेमका हा कोणता आजार झाला होता?, या दरम्यान त्यांना कोणत्या समस्या आल्या आणि यावर त्यांनी कसा उपचार केला? याबद्दलची माहिती त्यांनी नुकतंच ‘मित्रम्हणे’ या युट्युब पॉडकास्टमध्ये दिली आहे.
या मुलाखतीमध्ये अभिनेते विद्याधर जोशी म्हणाले की “या आजारपणाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मला काहीच माहीत नव्हतं तेव्हा व्यायाम करताना किंवा इमारतीचे मजले चढताना मला नेहमीपेक्षा जरा जास्त थकवा जाणवत होता. माझा चुलत भाऊ डॉक्टर असल्याने सगळ्यात आधी मी याबद्दल त्याला कळवलं. पण, तो म्हणाला ‘अरे! साठी झाली तुझी…’ त्यामुळे याकडे मी फार लक्ष दिलं नाही. त्यानंतर कोविडची लाट ओसरल्यावर मला जास्त त्रास जाणवू लागला. मला पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतराने दोन वेळा कोविडची लागण झाली होती. कोविड आजार बरा होऊनही माझा ताप संपूर्णपणे जात नव्हता. त्यामुळे आम्ही रितसर डॉक्टरांचा सल्ला घेतला. माझं सिटीस्कॅन करण्यात आलं आणि त्यात डॉक्टरांना फुफ्फुसावर जखम झाल्याचं दिसून आलं. या काळात पुण्याच्या एका डॉक्टरने हा कोविडचा पॅच नसून हे काहीतरी वेगळं दिसतंय असं मला सांगितलं. त्या काळात सुरुवातीपेक्षा मला आणखी मोठ्या प्रमाणात दम आणि थकवा लागत होता.”
“शेवटी आम्ही भाटिया रुग्णालयातील डॉ. सुजीत राजन यांच्याकडे गेलो. त्यांनी मला तपासून तुम्हाला लंग्ज फायब्रोसिस झालाय असं सांगितलं. Interstitial lung disease (ILD) असं माझ्या आजाराचं संपूर्ण नाव होतं. इतर आजारांमध्ये लोक बरे होऊन पुन्हा कामाला लागतात असं मी ऐकून होतो. पण, माझ्या आजारावर काहीच उपाय नाही असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं. याशिवाय यावर काही औषध नाही आणि हा आजार आपल्याला थांबवताही येत नाही. डॉक्टरांनी उपाय नाही हे सांगितल्यावर आम्ही थोडेसे घाबरलो. तरीही हरकत नाही एवढं मी म्हणालो. पहिल्या तपासणीत माझं फुफ्फुस जवळपास 13 टक्के निकामी झालं होतं आणि पुढे तुमचं फुफ्फस आणखी निकामी होईल याची कल्पना मला देण्यात आली होती. हळुहळू डॉक्टरांशी सगळी चर्चा केल्यावर मला या आजाराबद्दल सगळी माहिती मिळाली होती.”
“मनाची तयारी करून मी वैयक्तिक आयुष्यात उभारी घेतली होती. पण, हळुहळू गोष्टी फार बिकट झाल्या. माझा त्रास वाढू लागला. तो त्रास खरंच शब्दांत सांगता येणार नाही. शेवटी आम्हाला डॉक्टरांनी फुफ्फुसांचं प्रत्यारोपण करणं हा शेवटचा उपाय आहे असं सांगितलं. देशात फक्त हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईत रिलायन्स रुग्णालयात ही फुफ्फस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होते असं मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं. यानंतर मला कोणीतरी अवधूत गुप्तेच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ही शस्त्रक्रिया झाल्याचं सांगितलं. अवधूतने फोनवर मला याचं गांभीर्य, ही शस्त्रक्रिया नेमकी काय आहे याची माहिती दिली. तसेच यासाठी खूप पैसे लागतात असंही त्याने सांगितलं. त्याच्याकडून खर्चाची आकडेवारी ऐकल्यावर मी पत्नीला ‘अगं मी एवढे पैसे या वयात खर्च करून काय करणार?’ असंही म्हटलं होतं. त्यामुळे पुढचं सगळं आर्थिक नियोजन माझ्या कुटुंबीयांनी बघितलं.”
“15 डिसेंबरनंतर साधारण 19 तारखेला आम्ही पत्नीच्या भावाच्या घरी गोरेगावला राहायला गेलो. तेव्हा माझी मनस्थिती खूप नाजूक झाली होती. तेव्हा माझं फुप्फस 43 टक्के निकामी झालं होतं. सकाळी ब्रश केल्यावर दम लागायचा, स्वच्छतागृहात जाऊन आल्यावर अवस्था प्रचंड वाईट व्हायची. काही दिवसांनी मला टॉयलेटमध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर घेऊन जावं लागायचं. तरीही त्रास कमी होत नव्हता. नियोजनानुसार मला 5 जानेवारीला रुग्णालयात दाखल व्हायचं होतं. पण, 31 डिसेंबरच्या रात्री त्रास भयंकर बळावला आणि मी बायकोला रुग्णवाहिका मागव असं सांगितलं. तीन पावलं चालून मी खाली पडलो, माझ्यात जराही त्राण उरला नव्हता. पुढे, मला गोरेगावमधील जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 2 जानेवारीला मला रिलायन्स रुग्णालयात बेड मिळाला आणि आम्ही तिथे शिफ्ट झालो.” अशी माहिती विद्याधर जोशी यांनी दिली आहे.
यानंतर हॉस्पिटल मध्ये दाखल झाल्यानंतर विद्याधर जोशी यांच्यावर कसे उपचार झाले याबद्दलची माहिती त्यांच्या पत्नी वैशाली जोशी यांनी या मुलाखतीत सांगितली आहे. यात त्या म्हणाल्या की “मला डॉक्टरांची टीम भेटली आणि त्यांनी मला याला व्हेंटिलेटर ठेवावं लागेल असं सांगितलं. मला सुरुवातीला काहीच समजतं नव्हतं. हळुहळू त्याला व्हेंटिलेटर सुद्धा पुरत नव्हतं. अशावेळी मला डॉक्टरांनी तुम्ही प्रत्यारोपण करणार का? असं विचारलं. मी होकार कळवून सगळी प्रक्रिया पूर्ण केली. त्या (ECMO – extracorporeal membrane oxygen device) मशिनचा एका दिवसाचा खर्च 1 लाख वगैरे होता. 4 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत हा त्या मशिनवर होता. फुफ्फुस मिळाल्यावर याला रात्री 11.30 वाजता शस्त्रक्रिया करण्यासाठी आत घेतलं. बरोबर रात्री साडेतीन ऑपरेशन सुरू झालं ते दुसऱ्या दिवशी एक ते दीड वाजता त्याला बाहेर आणलं. 72 तासांनी मी त्याला हाक मारली तेव्हा तो शुद्धीवर आला.” अशी माहिती वैशाली जोशी यांनी सांगितली आहे.
अभिनेते विद्याधर जोशी यांच्या प्रकृतीत आता पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा झाली आहे. आणि लवकरच ते पूर्वीसारखे पुन्हा अभिनय करतांना सुद्धा दिसतील.
I’ve been following this blog for years and it’s amazing to see how much it has grown and evolved Congratulations on all your success!