पूर्वी प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम ‘पत्र’ असायचे, पण आताच्या डिजिटल युगात सोशल मिडियाद्वारे प्रेम व्यक्त केले जाते, सोशल मिडियावरून होणाऱ्या प्रेमाला आता देशांच्या सीमांचे देखील बंधन राहिले नाही.. यापूर्वी सोशल मिडियाद्वारे अनेक विदेशी तरुणी भारतातील तरुणांच्या प्रेमात पडून भारतात आल्याचे आपण बातम्यांमध्ये वाचले आहे, आताही आंध्र प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे.
जॅकलिन फोरेरो असं या अमेरिकन युवतीचं नाव असून ती आंध्र प्रदेशातील चंदनच्या प्रेमात पडली आहे. इन्स्टाग्रामवरून त्यांची ओळख झाली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर जॅकलिनने थेट आंध्र प्रदेश गाठलं. हे दोघे आता लग्न करणार आहेत.
इंस्टाग्रामवर प्रेम झाले
अमेरिकेत राहणारी जॅकलिन ही व्यवसायाने फोटोग्राफर आहे. तिने चंदनचे इंस्टाग्राम प्रोफाइल पाहिले आणि त्याचा साधेपणा, प्रेमळपणा आणि देवाप्रती भक्ती पाहून ती आकर्षित झाली. जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये चंदनसोबतच्या पहिल्या संभाषणाबद्दल सांगितले. ‘मी पहिल्यांदा चंदनला मेसेज केला आणि त्याची प्रोफाइल पाहिल्यानंतर मला वाटले की तो एक एक चांगला ख्रिश्चन आहे ज्याला धर्मशास्त्रात रस आहे.’ असं जॅकलिन म्हणाली.
जॅकलिन पुढे म्हणते की, त्या दिवशीचा एक मेसेज हळुहळू रंजक संभाषणात बदलला आणि 14 महिन्यांत त्यांचे प्रेम इतके गडद झाले की ते एकमेकांशिवाय जगण्याचा विचारही करू शकत नव्हते.
वयात फरक असूनही प्रेमावर विश्वास
जॅकलिन आणि चंदनच्या नात्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. कधी लोक त्याची चेष्टा करायचे तर कधी त्यांना पाठिंबा मिळायचा. वास्तविक, जॅकलिन आणि चंदन यांच्या वयात 9 वर्षांचा फरक आहे. पण याचा त्यांच्या नात्यावर कोणताही परिणाम झाला नाही. जॅकलिनने सांगितले की, त्यांना सोशल मीडियावर वयाच्या अंतराबाबत अनेक प्रतिक्रियांना सामोरे जावे लागले आहे. कधी नकारात्मक तर कधी सकारात्मक, पण आम्हाला विश्वास आहे की जर आमचे नाते खरे असेल तर देव आम्हाला एकत्र आणेल.
आईच्या संमतीनंतर भारताचा प्रवास
या सुंदर प्रेमकथेचा सर्वात मनोरंजक भाग म्हणजे जॅकलिनच्या आईने हे नाते पूर्णपणे स्वीकारले. तिच्या आईची संमती मिळाल्यानंतर, जॅकलिन आणि तिची आई चंदनला भेटण्यासाठी भारतात गेली. जॅकलिन म्हणाली, ‘आठ महिन्यांच्या ऑनलाइन डेटिंगनंतर आणि माझी आई भारतात आलो आणि हा आयुष्यभराचा सुंदर अनुभव ठरला.’
लग्नाच्या तयारीत व्यस्त
आता हे जोडपे भारतात त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. जॅकलिन आणि चंदनने एक यूट्यूब चॅनल देखील सुरू केले आहे. त्यावर ते त्यांच्या प्रेमकहाणीचे आणि एकमेकांसोबत घालवलेल्या खास क्षणांचे व्हिडीओ शेअर करतात. जॅकलिनने लिहिले की, “आमच्या प्रेमकथेवर बरीच टीका झाली आहे, पण देवाने आमच्यासाठी प्रत्येक टप्प्यावर मार्ग खुला केला आहे. आता आम्ही एका नव्या सुरुवातीसाठी तयार आहोत.”
लग्नाचे स्वप्न आणि चंदनचा व्हिसा
आता या जोडप्याने चंदन व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज केला आहे जेणेकरून ते अमेरिकेत त्यांचे नवीन आयुष्य सुरू करू शकतील. जॅकलिनने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्यासाठी हा एक नवीन अध्याय आहे आणि आम्ही या प्रवासासाठी खूप उत्सुक आहोत’.