ज्वेलर्सच्या दुकानातल्या आजी आजोबांची खरी कहाणी ऐकून येईल डोळ्यात पाणी | Viral Video

Viral Video

Viral Video: मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका आजी आजोबांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओ मधील आजोबा त्यांच्या सोबत असलेल्या आजीसाठी मंगळसूत्र घेण्यासाठी सोनाराच्या दुकानात गेले, तेव्हा त्यांच्या मधील प्रेम बघून दुकानदाराने फक्त 20 रुपये घेत त्यांना ते दागिने मोफत दिले, यानंतर आजी आजोबांच्या डोळ्यांत अश्रू आले. असा हा व्हायरल व्हिडीओ आहे. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आणि सर्वांनी आजी आजोबा यांतील या वयातही असणार्‍या प्रेमाचे आणि दुकानदाराने दाखवलेल्या उदारपणाचे कौतुक केले आहे. पण या व्हिडिओ मागची संपूर्ण कहाणी काय? याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ.

सोशल मीडियावर आजी-आजोबांचा सोन्याच्या दुकानातील हा व्हायरल व्हिडिओ छत्रपती संभाजीनगर मधील औरंगपुरा येथील गोपीका ज्वेलरी येथील असून त्यांचे मालक निलेश खिवंसरा हे आहे. तर या व्हिडीओ मधील आजी आजोबा हे जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील रहिवासी असून, मुलगा सांभाळ करत नसल्याने गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती मिळतेय. या आजी आजोबांचं नाव शांताबाई आणि निवृत्ती शिंदे असं आहे. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार होता, मात्र काही वर्षांपूर्वी एका मुलाचं निधन झालं. तर, दुसरा मुलगा व्यसनी असल्याने त्याने सांभाळ करण्यास असमर्थता दाखवली. त्यामुळे त्यांनी आपले घर सोडत संभाजीनगर शहर गाठलं आणि गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून जीवन जगत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शहरातील वेगवगेळ्या भागात जाऊन ते पैसे मागतात.

हे आजी आजोबा पैसे मागण्यासाठी शहरातील गोपीका ज्वेलर्स या दुकानात ते गेले असताना बायकोला सोन्याचा दागिना घ्यावा अशी निवृत्ती शिंदे या 92 वर्षीय आजोबांची इच्छा झाली, तेव्हा आजोबा हे आजीला ‘घे एखादा दागिना’ असं म्हणत असताना दुकानाचे मालक निलेश खिवंसरा यांनी पाहिलं. मात्र त्यांच्याशी बोलण्यासाठी जाण्याआधी दोघेही निघून गेले. नंतर ते त्यांच्या दुसऱ्या दुकानात असताना सदरील आजी आजोबा तिथे आले. दोघांना पाहून निलेश यांनी त्यांच्याशी संवाद साधला, त्यात दोघेही पैसे मागून राहतात, हे लक्षात आले. शिवाय दागिना घेण्याची इच्छा आहे मात्र सोन्याचे दर काय आहेत हे त्यांना माहिती नाही. आपल्याकडे असलेल्या पैशात दागिने येतील, असं आजी आजोबांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी एक पोत घेतली आणि मंगळसूत्राची वाटी घेतली. पैसे विचारले तर 1120 रुपये त्यांनी समोर ठेवले, तर जवळपास एक दीड हजारांचे चिल्लर पैसे त्यांच्याकडे होते. ते पैसे देण्यास तयार होते. दुकानदार निलेश खिवंसरा यांची मात्र त्यांच्याकडून पैसे घेण्याची इच्छा झाली नाही. त्यामुळे त्यांनी आजीचे 10 आणि आजोबांचे 10 असे वीस रुपये घेतले. यानंतर आजी आजोबांच्या डोळ्यांत अश्रू आले.

असा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आता पर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ बघितला आणि सर्वांनी आजी आजोबा यांतील या वयातही असणार्‍या प्रेमाचे आणि दुकानदाराने दाखवलेल्या उदारपणाचे कौतुक केले आहे. त्यात आता आजी आजोबा रस्त्यावर दिसताच अनेकजण त्यांची विचारपूस करत आहे. यातील काही लोकांनी त्यांना आर्थिक मदत देखील केली आहे, पण अनेकजण त्यांच्या सोबत सेल्फी काढून जात आहेत. पण हे सर्व आजी आजोबा साठी विचित्र आहे, या सगळ्याचा त्यांना त्रास होतोय. गजानन महाराज मंदिर परिसरात भीक मागून उदरनिर्वाह करणाऱ्या या गरीब आजी आजोबांना एका दागिन्याची मदत तर झाली मात्र त्यांना कोणी निवारा देईल का? हा खरा प्रश्न आहे. म्हणूनच फक्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी या आजी आजोबांसोबत सेल्फी काढण्यापेक्षा त्यांना मदत करावी असे आवाहन आम्ही मराठीजनतर्फे सर्वांना करतोय.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top