उद्योगपती रतन टाटा आणि युवा शांतनू नायडू यांच्यात कुत्र्यांमुळे झाली मैत्री | Ratan Tata and Shantanu Naidu Friendship

Industrialist Ratan Tata and young Shantanu Naidu became friends because of dogs

Ratan Tata and Shantanu Naidu Friendship: टाटा या नावाच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे प्रसिद्ध उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योसमुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. रतन टाटा हे गेले काही दिवस आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचं त्यांनी सोमवारीच समाजमाध्यमांवर जाहीर केले होते. परंतु, बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. यशस्वी उद्योजकाचं उत्तम उदाहरण, परोपकार वृत्ती असणारे दयाळू व्यक्तीमत्त्व, प्राणीमात्रांवर पराकोटीचं प्रेम करणारे आणि माणसातलं माणूसपण जपणारे रतन टाटा अनंतात विलीन झाले. वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रतन टाटा यांना अखेरचा निरोप देण्याकरता देशभरातील असंख्य लोक मुंबईत दाखल झाले होते. पारशी समाजाच्या विधीनुसार विद्युत स्मशानभूमीत त्यांचावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Industrialist Ratan Tata and young Shantanu Naidu became friends because of dogs)

मैत्रीला वयाचे बंधन नसते

त्यांच्या निधनाचं वृत्त समजातच समाजमाध्यमांवर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी त्यांच्याप्रती शोक व्यक्त केला. तसेच त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी वरळीतील स्मशानभूमीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि इतर मंत्री आणि अंबानींसारखे उद्योजक, काही प्रसिद्ध खेळाडू आणि कलाकारही उपस्थित होते. सामान्य नागरिकांसह अनेक दिग्गज लोकांनी रतन टाटांना अखेरचा निरोप देण्याकरता गर्दी केली होती. पण यात सर्वांत जास्त चर्चा झाली ती रतन टाटा यांचा युवा मित्र शांतनू नायडू याची. रतन टाटा यांच्या निधानंतर शांतनू नायडू खूप भावूक झाल्याचे दिसला. असं म्हणतात की मैत्रीला वयाचे बंधन नसते अशीच शांतनू नायडू आणि रतन टाटा यांच्यातील ही मैत्री.

Ratan Tata and Shantanu Naidu Friendship
Ratan Tata and Shantanu Naidu Friendship

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा कमी वयाचा जवळचा मित्र शांतनू नायडू याने भावनिक पोस्ट केली आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन, असं शांतनूने म्हटलंय. ३० वर्षे वयाचा शांतनू आणि ८६ वर्ष वय असलेले रतन टाटा खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांची पहिली भेट कशी झाली आणि मैत्री कशी झाली, याचा किस्सा खुद्द शांतनूने एका मुलाखतीत सांगितला होता. यात त्याने सांगितले होते की रतन टाटा यांनी स्वतः फोन करून शांतनूला त्यांच्या सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शांतनूचा प्रवास एका पोस्टमधून सांगितला होता. रतन टाटांशी भेट कशी झाली आणि शांतून आता सध्या काय करतो? याबद्दल त्यानेच या पोस्टमध्ये माहिती दिली होती. तर कोण आहे शांतनू नायडू? तसेच त्याची आणि रतन टाटा यांच्या भेटी मागची कहाणी जाणून घेऊयात.

कोण आहे शांतनू नायडू? Who is Shantanu Naidu?

शांतनू नायडूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. शांतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. टाटा एल्क्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. त्याने भटक्या कुत्र्यांसाठी बनवलेल्या एका डिव्हाईसमुळे त्याची अन् रतन टाटा यांची भेट झाली होती.

कुत्र्यांवरचे प्रेम

शांतनूने (Shantanu Naidu) सांगितलं होतं की, “२०१४ मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करु लागलो. सगळं काही छान सुरू होतं. मात्र एकेदिवशी ऑफिसमधून घरी जाताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसता. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलं होतं. त्यामुळे तो मृतदेह पाहून मला खूप दु:ख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरुन बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली, त्यावेळी मला अगदी कसंतरी वाटलं. याबद्दल काहीतरी करायला हवं अशी जाणीव मला झाली. मग मी माझ्या काही मित्रांना फोन करून ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केला. जेणेकरून रिफलेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना दुरूनही दिसतील,” असं शांतनूने सांगितलं होतं.

शांतनू आणि रतन टाटा यांची भेट

पुढे शांतनू (Shantanu Naidu) म्हणाला की, “हे रिफलेक्टर काम करेल की नाही याची मला कल्पना नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि यामुळे एका कुत्र्याचा जीव वाचल्याचं मला कळालं. मला खूप आनंद झाला. माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली. अनेकांना या रिफलेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं त्यांनी मला सुचवलं. आधी मी नकार दिला, नंतर मी रतन टाटा यांना एक पत्र पाठवलं. काही दिवसांनी मी त्या पत्राबद्दल विसरलो. त्यानंतर अचानक एकदा मुंबईतील ऑफिसमध्ये ते मला भेटले आणि “तुझ्या कामाने मी प्रभावित झालो आहे” असं सांगितलं. आजही तो प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. नंतर त्यांनी रिफेलक्टर कॉलरच्या मोहिमेला आर्थिक मदत केली.”

टाटामधील नोकरी सोडण्याचा निर्णय

काही काळाने शांतनूने टाटामधील नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जायचं ठरवलं, तेव्हा त्याने रतन टाटा यांना एक वचन दिलं होतं. “मी शिक्षणासाठी परदेशात गेलो तरीही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करेन, असं आश्वासन मी रतन टाटांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला,” असं शांतनूने सांगितलं.

शांतनू भारतात परतल्यावर रतन टाटा यांनी फोन करून त्याला कामाची ऑफर दिली. याबद्दल शांतनूने सांगितलं की “मी शिक्षण पूर्ण करुन भारतात परतल्यावर त्यांनी मला फोन केला. ‘माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम आहे. तू माझा असिस्टंट होशील का?’ असं त्यांनी थेट विचारलं. काय बोलावं मला सूचत नव्हतं. अखेर मी त्यांना होकार दिला,” असं शांतनूने सांगितलं.

रतन टाटा हे सुपर ह्युमन आणि मिलेनियल डंबलडोर

रतन टाटा यांच्याबद्दल पुढे शांतनूने म्हटलंय की, “चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झटताना दिसतात. त्यावेळी मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही. कारण हे सगळं मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळालं आहे. लोक त्यांना बॉस म्हणतात पण मी त्यांना मिलेनियल डंबलडोर असं म्हणतो,” असं शांतनूने ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी २०१८ मध्ये बोलताना सांगितलं होतं.

अशी होती उद्योगपती रतन टाटा आणि त्यांचा युवा मित्र शांतनू नायडू यांची मैत्री.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top