Raj Thackeray Speech: हिंदी सक्तीच्या निर्णयाला झालेल्या विरोधानंतर सरकारनं हा निर्णय रद्द केला. या विरोधात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र मोर्चा काढणार होते. पण निर्णय रद्द झाल्यानंतर मोर्चाऐवजी विजयी मेळावा काढण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे नेमकं काय म्हणाले यबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया..
वरळी येथे हा मेळावा झाला. त्यात कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता पण राज आणि उद्धव ठाकरे अनेक वर्षांनतर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. “कुठल्याही भांडणापेक्षा आणि वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. 20 वर्षांनी आम्ही एकत्र येतोय. जे बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही. ते देवेंद्र फडणवीसांना जमलं.”, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
तर उद्धव ठाकरे यांनी, “आमच्यातला आंतरपाठ अनाजीपंतांनी दूर केला, एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी” असं विधान करुन पुढील राजकीय घडामोडींचे संकेत दिले.
प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, अजित नवले, जितेंद्र आव्हाड आव्हाड, महादेव जानकर, जयंत पाटील(शेकाप), विनोद निकोले, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत असे विविध पक्षांचे नेतेही या मेळाव्याला उपस्थित होते.
या मेळाव्यात राज ठाकरे म्हणाले की “हिंदीचं अचानक कुठून आलं कळलं नाही मला. हिंदी कशासाठी. कोणासाठी हिंदी. त्या लहान मुलांवर जबरदस्ती करताय तुम्ही. शिक्षणतज्ञ्जांना विचारायचं नाही. सत्ता आहे लादणार. तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात. आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर.”
“नंतर शिक्षणमंत्री दादा भुसे माझ्याकडे आहे. मला म्हणाले की, आम्ही काय म्हणतोय समजून तर घ्या, तुम्ही काय सांगताय ते ऐकून घेईल पण ऐकणार नाही म्हटलं.”
“हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जा सगळीकडे इंग्रजीत गोष्टी होतात. तिकडे कुठे आहे त्रिभाषा सूत्र. इतर राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला. दक्षिणेतले राज्य विचारत नाही ह्यांना.”
“महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे पाहिलं त्यांनी म्हणून तर माघार घेतली त्यांनी. हिंदी भाषिक राज्य आर्थिकदृष्ट्या मागास. हिंदी भाषिक नाहीत ते आर्थिकदृष्ट्या प्रगत. कोणासाठी हिंदी शिकायचं. पाचवीनंतर हिंदी चित्रपट सृष्टीत जायचंय का? कोणतीही भाषा उत्तमच आहे. प्रत्येक भाषा मोठी करायला प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात.”
“हिंदी प्रातांवरती 125 वर्ष मराठ्यांनी राज्य केलं. इतक्या प्रदेशांवरती राज्य केलं. आम्ही मराठी लादली का? हिंदी भाषा 200 वर्षांपूर्वीची भाषा आहे. महाराजांच्या काळातही नव्हती. ह्यांनी फक्त चाचपडून पाहिलं आहे. मुंबई स्वतंत्र करता येते का यासाठी भाषेला डिवचून पाहिलं. कोणी महाराष्ट्राला हात लावून दाखवावा. बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे इंग्रजी माध्यमात शिकलेले आहेत. लालकृष्ण अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले. त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?” असंही राज ठाकरे या मेळाव्यात म्हणाले.