बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरला अटक होणार – तिने फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक केली | Pooja Khedkar

Pooja Khedkar

Pooja Khedkar: वादग्रस्त बडतर्फ IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण दिल्ली उच्च न्यायालयाने नागरी सेवा परीक्षेत कथित फसवणूक आणि ओबीसी तसेच अपंगत्व कोट्याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्यासंबंधी खटल्यात अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने म्हटले की, असे दिसते की तिने (पूजा) उचललेली पावले व्यवस्थेत फेरफार करण्याच्या एका मोठ्या कटाचा भाग होती.

माजी प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिच्यावर नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC) आणि अपंगत्व कोट्याचा लाभ चुकीच्या पद्धतीने मिळवून फसवणूक केल्याचा आरोप आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरची अटकपूर्व जामीन याचिका मंजूर करण्यास नकार दिला आहे. यासाठी न्यायालयाने यूपीएससी ही प्रतिष्ठित परीक्षा मानली जाते असं कारण दिले आहे. प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली घटना ही केवळ एका संस्थेविरुद्धच नव्हे तर मोठ्या प्रमाणावर समाजाविरुद्ध फसवणूक दर्शवते असेही न्यायालयाने नमूद केले. या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी चौकशी आवश्यक आहे, यावरही न्यायालयाने भर दिला. यानंतर न्यायालयाने अटकपूर्व याचिका फेटाळल्याचा निर्णय दिला आणि खेडकर यांना दिलेले अंतरिम संरक्षण काढून घेतले.

फक्त युपीएससी नव्हे, तर समाजाची फसवणूक

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश चंद्र धारी सिंह यांनी याचिकेवर निर्णय देताना अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली जात असल्याचे सांगितले. याबरोबरच त्यांनी अटकेविरोधात अंतरिम संरक्षण देखील हटवण्यात आले असल्याचेही यावेळी स्पष्ट केले. पुढे त्यांनी नमूद केले की प्रथमदर्शनी खेडकर यांच्याविरोधात भक्कम केस होऊ शकते. अशा परिस्थितीत कटाच्या तपासासाठी चौकशीची आवश्यकता आहे. एका घटनात्मक संस्थेबरोबरच समाजाचीदेखील फसवणूक केल्याचे हे एक अनोखे प्रकरण आहे, असेही त्यांन स्पष्ट केले.

पूजा खेडकर वर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी यूपीएससी नागरी सेवा परीक्षा, २०२२ मध्ये आपल्या अर्जात चुकीची माहिती सादर केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलीसांचे वकील आणि तक्रारकर्ता संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी)च्या वकिलांनी खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी केलेल्या याचिकेला विरोध केला होता. यूपीएससीकडून वकील नरेश कौशिक आणि वकील वर्धमान कौशिक यांनी न्यायालयात बाजू मांडली.

या अगोदर ट्रायल कोर्टाने पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. यानंतर पूजाने न्यायालयाच्या आदेशाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. ऑगस्टमध्ये पूजाला अंतरिम संरक्षण मिळाले होते. पण आता दिल्ली उच्च न्यायालयाने तिची याचिका फेटाळली असल्याने पूजा खेडकरला मोठा धक्का बसला आहे.

पूजा खेडकरची बनवाबनवी

पूजा खेडकरने नागरी सेवा परीक्षा 2022 आणि 2023 दरम्यान दोन अपंगत्व प्रमाणपत्रे सादर केली होती. पूजा खेडकरने या अपंगत्व प्रमाणपत्राचा वापर करून यूपीएससीमध्ये निवडीसाठी विशेष सवलत मिळवली होती. एवढेच नाही तर परीक्षेत कमी गुण मिळूनही सवलतींमुळे पूजा खेडकर ही परीक्षा उत्तीर्ण झाली. त्याने UPSC मध्ये 841 ऑल इंडिया रँक (AIR) मिळवले होते. दिल्ली पोलिसांच्या स्टेटस रिपोर्टनुसार 2022 आणि 2024 मध्ये पूजा खेडकरने सादर केलेले दोन अपंगत्व प्रमाणपत्र (एकाधिक अपंगत्व), जे वैद्यकीय प्राधिकरण, अहमदनगर, महाराष्ट्र यांनी कथितरित्या जारी केले होते, ते बनावट असू शकतात. कारण त्यांची वैद्यकीय प्राधिकरणाकडून पडताळणी केली असता त्यांनी हे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला. पूजा खेडकर दावा करत असलेले अपंगत्व प्रमाणपत्र त्यांनी दिलेले नाही, असे प्राधिकरणाने म्हटले आहे.

तसेच 2012 पासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि तिचे आई-वडिल वेगवेगळ्या नावांनी वावरत आल्याची माहिती आहे. त्यामुळे यंत्रणेला वेळोवेळी फसवण्यात ते यशस्वी ठरले. या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पूजा खेडकरने (Pooja Khedkar) यूपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी, नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केला आहे. त्यामुळे यूपीएससी परिक्षा देण्याच्या 9 संधी संपल्यानंतर देखील पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) 12 वेळा नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती आहे.

2012 साली पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) यूपीएससीची परीक्षा देताना नाव वापरलं होतं ते पूजा खेडकर दिलीपराव आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं खेडकर दिलीपराव कोंडिबा. ही परिक्षा देताना त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र वापरलं नव्हतं.

2018 मध्ये परिक्षा देताना पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी स्वत:च्या देखील नावात बदल केला होता. पूजा दिलीप खेडकर असं स्वत:चं नाव वापरुन परिक्षा दिली होती. त्यासोबतच वडिलांच्या नावात देखील बदल करुन खेडकर दिलीप कोंडिबा असं नाव वापरलं होतं आणि आईचं माहेरचं नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ वापरलं होतं. 2018 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.

2019 मध्ये परिक्षा देताना पुन्हा नाव बदललं होतं. त्यावेळी खेडकर पुजा दिलीपराव (Pooja Khedkar) केलं होतं. वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के. तर आईचं नाव बुधवंत मनोरमा जे. असं वापरलं आहे. यावेळी दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.

2020 मध्ये परिक्षा देताना खेडकर पुजा दिलीपराव हे नाव वापरलं होतं तर वडिलांच खेडकर दिलीपराव के. वापरलं तर आईचं नाव पुन्हा बदलून बुधवंत मनोरमा जे. करुन परिक्षा दिली होती. यावेळी दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.

2021 मध्ये तर पुजा खेडकरने परीक्षा देताना थेट आई आणि वडिलांचं एकत्र नाव लिहिलं आहे. ते पुजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. वडिलांचं दिलीप खेडकर तर आईचं माहेरचं नाव मनोरमा बुधवंत वापरलं आहे. 2021 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.

2022 मध्ये पुजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरलं आणि पुन्हा वडिलांच्या नावात किंचित बदल करुन दिलीप के. खेडकर केलं आणि आईचं नाव मनोरमा बुधवंत केलं आणि यावेळी मात्र मल्टिपल डिसॅबिलीटीचं म्हणजेच PWbD-5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं.

2023 ला परीक्षा देताना पुजा मनोरमा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव दिलीप खेडकर आणि मनोरमा बुधवंत नाव वापरलं. यावेळी देखील मल्टिपल डिसॅबिलीटीचं म्हणजेच PWbD-5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top