Plastic Bottle Harmful Side Effects: आजकाल प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा उपयोग खूप वाढलाय. विशेषतः पिण्याच्या पाण्यासाठी अनेक लोक सध्या प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात. पण हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे का? प्लॅस्टिकच्या बाटल्यांत सतत पाणी पिल्याने आपल्या आरोग्याचे किती मोठे नुकसान होऊ शकते? याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. (Plastic Bottle Harmful Side Effects on Human Health)
अनेक लोक प्रवासात पिण्याचे शुद्ध पाणी सोबत घेण्सासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करतात. कारण त्या वजनाने हलक्या असतात. त्यामुळे कितीही दूरचा प्रवास असला तरीही आपण प्लॅस्टिकच्या बाटल्या सहज पिशवीत कुठेही घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे जास्तकरून लोक प्रवासात प्लॅस्टिकच्या बाटल्याच जास्त वापरतात. किंवा काही लोक प्रवासात पिण्याचे पाणी असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या दुकानातून विकत घेतात. पण हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. काही लोक तर आजकाल घरात सुद्धा पिण्याचे पाणी प्लॅस्टिकच्या बाटल्यांत भरून ठेवतात. काही जन पिण्याचे पाणी असलेल्या या बाटल्या दिवस-दिवसभर फ्रीजमध्ये ठेवतात. घरी ग्लास किंवा इतर सुविधा असून सुद्धा लोक असं प्लॅस्टिकच्या बाटल्यांत पिण्याचे पाणी भरून ठेवतात. हे अत्यंत चुकीचे असून आरोग्याच्या दृष्टीने खूप घातक आहे.
प्लॅस्टिकच्या बाटल्या आरोग्यासाठी हानिकारक
खरंतर प्लास्टिक हे निसर्ग आणि मानवी आरोग्य या दोन्हींसाठी अत्यंत हानिकारक आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार भारतात दरवर्षी 35 लाख टन प्लास्टिकचा कचरा (plastic waste) निर्माण होत आहे. म्हणूनच वाढत जाणारा हा प्लास्टिकचा कचरा आपल्या संपूर्ण देशासाठी खूप हानिकारक ठरेल. त्यामुळे प्लास्टिकचा वापर हा एकदम कमीत कमी करायला पाहिजे.
प्लास्टिकमध्ये फ्लोराईड, आर्सेनिक आणि ॲल्युमिनियमसारखी अनेक प्रकारची हानिकारक केमिकल्स (harmful chemicals) आढळतात, जी आपल्या आरोग्याला हानी पोहोचवतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी तर प्लास्टिकच्या बाटल्या न वापरणेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरेल. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी प्यायल्याने आपल्या शरीराला अनेक आजार निर्माण होऊ शकतात. त्यातही महत्वाचे म्हणजे लहान मुलांसाठी दुध प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये देवू नये, कारण प्लॅस्टिकची बाटली जर एकदम स्वच्छ धुतली गेली नाही तर त्यामध्ये जीवाणूंची पैदास होऊ शकते. आणि यामुळेच लहान मुले सतत आजारी पडू शकतात.
एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये नॅनो प्लास्टिकचे तुकडे
नुकतंच कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि रटजर्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासकांनी अमेरिकेत विक्रीस असणाऱ्या अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्यासंबधीत अभ्यास केल्यानंतर हे पाणी आरोग्यास नुकसानकारक असल्याचे समोर आले. या अभ्यासात असं म्हटलंय की एक लिटर पाण्याच्या बाटलीमध्ये सुमारे 2 लाख 40 हजार इतके नॅनो प्लास्टिकचे तुकडे आढळतात, जे आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही. हे कण इतके लहान आहेत की ते मानवी रक्तातही प्रवेश करू शकतात.
बाटली उष्णतेच्या संपर्कात आल्यास..
जेव्हा पिण्याचे पाणी असलेली प्लास्टिकची बाटली उष्णतेच्या संपर्कात येते तेव्हा ती पाण्यात सूक्ष्म प्लास्टिक कण सोडते. प्लास्टिकचे हे छोटे कण मानवी शरीराला खूप हानी पोहोचवतात. त्यांचे आपल्या शरीरातील प्रमाण जर वाढले तर हार्मोन्सचे असंतुलन, हृदयविकार, मधुमेह, वंध्यत्व आणि यकृताशी संबंधित अशा अनेक आरोग्य समस्या आपल्या शरीरात निर्माण होतात. तसेच प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते. प्लास्टिकच्या बाटल्यांचा दीर्घकाळ वापर केल्याने पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या म्हणजेच स्पर्म काऊंट (Sperm Count) कमी होतो. तर मुलींनी प्लास्टिकच्या बाटल्यांत सतत पाणी पिल्यास त्या लवकर वयात येण्याची समस्या निर्माण होऊ शकते. तसेच गर्भाशयाशी संबंधित आजार, स्तनाचा कर्करोग (Breast Cancer), आतड्याचा कर्करोग, प्रोस्टेट कर्करोग ई आजार होण्याचा धोकाही वाढतो.
BPA केमिकल अत्यंत हानिकारक
बहुतेक प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये ‘बिसफेनोल ए (BPA)’ हे केमिकल असतं. ‘बिस्फेनॉल ए’ हे एक रासायनिक संयुग आहे जे प्रामुख्याने विविध प्लास्टिकच्या निर्मितीमध्ये वापरले जाते. पाणी पितांना हे केमिकल पाण्यासोबत मिसळून आपल्या शरीरात गेल्यास आरोग्याच्या दृष्टीने ते खूप हानीकारक ठरू शकतं. म्हणूनच पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकची बाटली विकत घेताना ती BPA नसलेली असेल अशी बघून घ्या. अशी पाण्याची प्लॅस्टिक बाटली जर उन्हात ठेवली तर सूर्यकिरणांमुळे BPA केमिकल पाण्यात खूप फास्ट मिसळलं जातं. त्यामुळे अशा बाटलीतले पाणी प्यायल्यास ते आपल्या शरीरासाठी खूप घातक ठरू शकतं. BPA केमिकल प्लास्टिकच्या बाटलीमधून पाणी पिऊन रक्तप्रवाहात प्रवेश करतात. म्हणजेच ते हृदय कमकुवत करतात, त्यामुळे याचा परिणाम शरीरातील रक्ताभिसरणांवरही होतो.
तसेच प्लॅस्टिकच्या बाटल्यांतील हे नॅनोप्लास्टिक्स आतड्यात सहजपणे शोषले जातात. त्यानंतर ते यकृतात जमा होतात. हे कण यकृताच्या पेशींना मारून टाकतात. तसेच हे नॅनोप्लास्टिक्स फुफ्फुसात जाऊन रक्तवाहिन्या आणि ऊतींचे खूप मोठे नुकसान करू शकतात.
या बाटल्यांचा पुनर्वापर करता येत नाही
प्लॅस्टिकच्या बाटल्या, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या यांचा पुनर्वापर करता येत नाही. या बाटल्यांच्या वरच्या बाजूला किंवा काही बाटल्यांच्या खालच्या बाजूला एक त्रिकोण असतो, त्यावर 1,2 किंवा 3 असे अंक लिहिलेले असतात. यातील 1 या अंकाचा अर्थ या बाटलीचा केवळ एकदाच वापर होऊ शकतो. असाच या सर्व अंकांचा अर्थ असतो. त्यामुळे जर या बाटल्यांचा पाणी पिण्यासाठी पुनर्वापर केला तर हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरेल.
प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी कशाचा वापर करावा?
पाणी पिण्यासाठी प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करणे किती हानिकारक ठरू शकते हे आपण बघितले. पण मग प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिण्याऐवजी कशाचा वापर करावा? तर घरात पाणी पिण्यासाठी स्टील किंवा काचेचे ग्लास (Drinking Glasses) हे जवळ-जवळ प्रत्येक घरात असतातच. मग प्लॅस्टिकच्या बाटल्यांऐवजी स्टील किंवा काचेचे ग्लास यांचा पाणी पिण्यासाठी वापर करावा.
लहान मुलांनाही काचेच्याच बाटलीतून दूध पाजणं फायदेशीर आहे. काचेची बाटली फुटण्याचा धोका असतो, त्यामुळे बाटली घेताना त्यावर सिलिकॉन कव्हर असलेली बाटली विकत घ्या. तसेच प्लॅस्टिक बाटलीपेक्षा काचेची बाटली स्वच्छ करणं सहज शक्य आहे. प्लॅस्टिकच्या बाटलीत जास्त दिवस पाणी ठेवल्यास त्याची चव बदलते, मात्र काचेच्या बाटलीत पाणी अनेक दिवस राहू शकतं.
अशा प्रकारे प्लॅस्टिकच्या बाटल्यांचे दुष्परिणाम बघता आता पाणी पिण्यासाठी अनेक लोक काचेच्या बाटल्या किंवा स्टीलच्या बाटल्यांचा वापर करत आहे. पण जर तुम्ही अजूनही प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा.
Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.
Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.