Urmila Kothare: अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू, अभिनेत्रीही जखमी

urmila kothare car accident

Urmila Kothare: प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडली. शुक्रवारी (२७ डिसेंबरला) घडलेल्या या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

उर्मिला कानेटकर-कोठारे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री असून ती प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची सून असून अभिनेता आदिनाथ कोठारेची पत्नी आहे. ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वी ती ‘तुझेच मी गीत गात आहे’ या स्टार प्रवाह वरील मालिकेतही झळकली होती.

उर्मिला कोठारे शूटिंग संपवून घरी परतत होती, त्यावेळी तिच्या कारचा अपघात झाला. चालकाचं कारवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाला. कारने दोन मजुरांना उडवलं, त्यापैकी एका मजुराचा मृत्यू झाला असून दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. या अपघातात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याच समजतंय.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, याप्रकरणी समता नगर पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाल्यावर गाडीतील एअर बॅग्ज वेळीच उघडल्याने उर्मिलाचा जीव वाचला. तिच्या गाडीचं नुकसान झालं आहे. आयएएनएसने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कारच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाल्याचं दिसतंय.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top