Malhar Certifications: राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी फक्त हिंदू धर्मीय झटका मटण आणि चिकन विक्रेत्यांच्या नोदणींसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम’ नावाचं पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे. यानुसार सर्व नोंदणीकृत मांस विक्रेत्यांना ‘मल्हार प्रमाणपत्र’ दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र फक्त हिंदूंनाच दिलं जाणार आहे. त्याव्यतिरिक्त इतर धर्मीयांना ते उपलब्ध नसेल. त्यामुळेच हे मल्हार प्रमाणपत्र काय आहे? झटका आणि हलाल पद्धतीमध्ये नेमका काय फरक आहे? हे जाणून घेऊयात.
राणे यांनी काय म्हटलंय?
मल्हार प्रमाणपत्राबाबतची माहिती नितेश राणे यांनी एक्स (ट्विटर) या समाज माध्यमावरून एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, “महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्त्वाचं पाऊल, आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम (malharcertification.com) या निमित्ताने सुरू झालं आहे. झटका मटणसाठी मल्हार सर्टिफिकेशन ही एक नवी संकल्पना आम्ही हिंदू समाजासाठी आणतोय. “ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं, जिथे 100 टक्के हिंदू समाजाचं प्राबल्य असेल. विकणाराही पण हिंदू असेल,” असं राणे यांनी म्हटलं आहे.
“त्या मटणात भेसळ नसेल. या माध्यमातून हिंदू समाजाला सक्षम करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल हिंदुत्ववादी विचारांच्या सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी टाकलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनचा (Malhar Certifications) वापर आपण जास्तीत जास्त करावा, ज्या मटणाला हे प्रमाणपत्र नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये, मटण खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन. या पूर्ण प्रयत्नाला आमचा 100 टक्के पाठिंबा आहे,” असेही राणे म्हणाले. नितेश राणेंच्या भूमिकेमुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आज मल्हार सर्टिफाइड झटका मांस
— Nitesh Rane (@NiteshNRane) March 10, 2025
आज आम्ही महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी अतिशय महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम(https://t.co/fQAwGvAdca) या निमित्ताने सुरू झालेलं आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील व १००… pic.twitter.com/u0zdi2rjBt
मल्हार प्रमाणपत्र काय आहे?
मल्हार वेबसाईटनुसार, हिंदू धार्मिक पद्धतींचं काटेकोर पालन करून झटका पद्धतीचं मांस पुरवण्याऱ्या विक्रेत्यांनाच हे प्रमाणपत्र (Malhar Certifications) दिलं जाणार आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विक्रेते फक्त हिंदू धर्माचेच असायला हवेत, त्यांनाच हे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हिंदू आणि शीख धर्मातील लोकांसाठी झटका पद्धतीचं मांस उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं म्हटलं आहे. कारण झटका पद्धतीचं पालन करून मांस विकणं आणि खाणं हीच एक नैतिक पद्धत असल्याचं बहुतेक हिंदू मानतात. या पद्धतीनं त्या प्राण्याचे हाल न होता पटकन जीव जातो, असे या वेबसाईटवर म्हटले आहे.
झटका पद्धत आणि हलाल पद्धत म्हणजे काय?
या मल्हार सर्टिफिकेटच्या (Malhar Certifications) वादामुळे झटका मांस आणि हलाल मांस यांच्यात नेमका फरक काय आहे, असा प्रश्नं अनेकांना पडला आहे.
कोणतंही मांस हलाल आहे की झटका हे त्या प्राण्याला ज्या पद्धतीनं कापलं जातं त्यावरून ठरतं.
हलाल पद्धत: हलाल हा अरेबिक शब्द आहे. याचा अर्थ आहे ज्या गोष्टीची परवानगी आहे ते. इस्लामिक कायद्यानुसार आणि कुराणने सांगितल्यानुसार जी पद्धत आहे त्याला हलाल असे म्हणतात. हलाल म्हणजे कोंबडीच्या किंवा बकऱ्याच्या मानेवरून चाकू फिरवला जातो, शीर मात्र धडावेगळं केलं जात नाही. श्वासनलिका कापली की सगळं रक्त बाहेर पडतं आणि तडफडून त्या प्राण्याचा मृत्यू होतो. अशा पद्धतीनं प्राणी कापल्यावर त्याला हलाल प्रमाणपत्र दिलं जातं पण ते सरकारकडून दिलं जात नाही.
झटका पद्धत: याउलट एका झटक्यात जेव्हा प्राण्याची मान धडावेगळी केली जाते तेव्हा त्याला झटका मटण किंवा झटका चिकन म्हणतात. नावावरूनच कळतं की यात तो प्राणी एका झटक्यात कापला जातो. त्यामुळे त्या प्राण्याच्या शरीरातून रक्त बाहेर पडून, त्याची तडफड होत नाही. या पद्धतीत प्राण्याला गुंगी देऊन बेशुद्धही केलं जातं. बहुतेक शीख आणि हिंदू धर्मीयांमध्ये ही पद्धत वापरली जाते.
नितेश राणे यांनी मल्हार प्रमाणपत्र (Malhar Certifications) उपलब्ध असेल त्याच दुकानातूनच मांस विकत घेण्याचं आवाहन देखील राज्यातील हिंदू जनतेला केलं आहे. मात्र, या निर्णयानंतर नितेश राणे यांच्यावर टीका का होत आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीनं असं आवाहन करणं योग्य आहे का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय. विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी मल्हार प्रमाणपत्रामुळे (Malhar Certifications) राज्यात धार्मिक ध्रुवीकरणाची भीती व्यक्त केली आहे. सध्या मल्हार प्रमाणपत्रावरून राज्यात वेगवेगळे मत प्रवाह बघायला मिळत आहे.
इतर अधिक माहितीसाठी आपल्या मराठीजन या वेबसाईटला फॉलो करा, तसेच आपले App डाउनलोड करा – Download App