Maharashtra Kesari winner Sikander Shaikh: महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरीची फायनल लढत पुणे जिल्ह्याच्या फुलगाव येथे ‘सिकंदर शेख आणि गतवर्षीचा विजेता शिवराज राक्षे’ यांच्यात झाली. यात पैलवान सिकंदर शेख याने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा जिंकली आहे. (Maharashtra Kesari winner Sikander Shaikh life story)
अवघ्या 10 सेकंदात केले चितपट
गेल्यावेळी थोडक्यात महाराष्ट्र केसरी पद हुकलेल्या सिकंदर शेख याने अवघ्या 10 सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा आणि महिंद्रा थार गाडी आपल्या नावावर केली.
अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरचे पारडे निश्चित जड होते. पण, शिवराज त्याला आव्हान देईल अशी अपेक्षा होती. मात्र, वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदरपुढे शिवराजचा निभाव लागला नाही. लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.
गतवर्षीचा खरा विजेता मीच – सिकंदर
सिकंदर शेख याने गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असं सांगत म्हटलंय की “यावर्षी मी गेली सहा-सात महिने पुर्ण तयारी करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला. याचं खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं. मागील वर्षी वाद खोटा उठवला होता. त्यावेळीही मीच खरा विजेता होतो.” असं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने सांगितले.
22 वर्ष वयाचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे. लहान वयातच अनेक मातब्बर पैलवानांना पराभूत केल्यामुळे सिकंदर प्रसिद्धीच्या झोतात आला.
घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती
सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्तीची तालीम मोहोळमधूनच सुरू झाली. घरी हालाखीची आर्थिक परिस्थिती असुनही त्याच्या आई-वडिलांनी त्याला पैलवान होण्यासाठी प्रोत्साहित केलं.
सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले. खुराक-पाण्यासाठी पैसे नसायचे त्यामुळे पैलवानी करता करता ते हमाली करायचे. सिकंदर तालमीत असताना त्याच्या कुटुंबाची परिस्थिती तेव्हाही हलाखीची होती. त्याचे आई-वडील स्वत:चं पोट मारुन सिकंदरला खुराक द्यायचे. वडिलांना हमालीतून रोजचे जे शंभर-दोनशे रुपये सुटायचे त्यातले पैसे ते सिकंदरला खुराक साठी द्यायचे. सिकंदरला पैलवान करण्याची त्यांचं इतकं भक्कम स्वप्न होतं की ते स्वत:च्या खाण्याकडेही लक्ष देत नव्हते. 2017-2018 साली त्यांना खूपच आर्थिक अडचण सहन करावी लागली.
गंगावेश तालमीत पाठवायचा निर्णय
सिकंदर नऊ-दहा वर्षांचा असताना मोहोळमधल्या फाटे तालमीत त्याचा कुस्तीचा सराव सुरु झाला. मोहोळमध्ये चंद्रकांत काळे हे त्याचे वस्ताद होते. पण त्याच्या बरोबरीचे पैलवान तालमीत नव्हते. बाकी मुलं ही लहान होती. त्यामुळे सिकंदरच्या वडिलांनी आणि त्याच्या वस्तादांनी त्याला कोल्हापुरातील गंगावेश तालमीत पाठवायचा निर्णय घेतला. तेव्हा तो अठरा वर्षांचा होता. त्याच्या खऱ्या पैलवानीला गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरुवात झाली.
त्याचा योग्य डाएट गंगावेश तालमीत आल्यापासूनच सुरु झाला. विश्वास हरगुळे हे त्याचे कोच आहेत. इथे आल्यानंतर 2018 साली त्याने पहिली स्पर्धा जिंकली. यामध्ये त्याने काही नामांकित पैलवानांचा पराभव केला. या स्पर्धेचं बक्षिस म्हणून त्याला एक बुलेट गाडी आणि एक लाख रुपये रक्कम मिळाली. यानंतर त्याची राज्यात आणि पंजाब, हरियाणामधल्या कुस्तीच्या स्पर्धांमध्ये विजयी घोडदौड सुरु झाली. आतापर्यंत जवळपास 200 स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

सिकंदरची आर्थिक परिस्थिती बदलली
कुस्तीच्या स्पर्धांमधला विजयाच्या मालिकेमुळे सिकंदरच्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा बदलून आता चांगली झाली आहे. पहिले त्याचे वडील हमाली करायचे, सायकल वरून फिरायचे. पण आता मात्र त्यांना हमाली करण्याची गरज राहिली नाही. आता त्याच्या वडिलांकडे इतक्या गाड्या झाल्या आहेत की त्यांना कोणती गाडी वापरु असं होतं. त्यांनी एक गाडी वापरली तर त्या गाडीचा महिनाभर नंबर येत नाही. आत त्यांनी घर बांधलं. जागा घेतली. शेत घेतलं. पुण्यात फ्लॅटही घेतले.
आता तर सिकंदरने ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा सुद्धा जिंकली आहे. याबद्दल त्याचे खूप अभिनंदन.