Ladki Bahin vs Mahalaxmi Yojana: महाराष्ट्रात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु आहे, राज्यात महायुतीचं सरकार कायम राहणार की महाविकास आघाडीला बहुमत मिळणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. पण त्याअगोदर महिला मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्हीही पक्षांकडून प्रयत्न सुरु आहे. महायुती असो वा महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांच्या जाहीरनाम्यात महिलांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांवर भर देण्यात आला आहे. यात माझी ‘लाडकी बहीण योजना’ विरुद्ध ‘महालक्ष्मी योजना’ असा संघर्ष बघायला मिळतोय.
महायुती सरकारने ‘माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये द्यायला सुरुवात केली. तसेच आता पुन्हा सरकार आल्यानंतर ही रक्कम 2100 रुपये केली जाईल असंही आश्वासन महायुतीच्या जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे.
आता लाडकी बहीण या योजनेला प्रत्युत्तर म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा त्यांचे सरकार आल्यास ‘महालक्ष्मी योजना’ सुरु करणार असल्याची घोषणा केली आहे. यात लाडकी बहीण योजनेपेक्षा दुप्पट पैसे म्हणजेच तीन हजार रुपये दर महिन्याला महिलांना देण्याचं आश्वासन महाविकास आघाडीने दिले आहे.
या विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांनी महिला मतदारांना सर्वाधिक प्राधान्य दिल्याचं दिसतंय. दोन्ही पक्षांनी महिला आणि मुलींसाठी अनेक घोषणा केल्या आहे, यात बेरोजगारांसाठी अर्थसहाय्य, मोफत प्रवास, मोफत उच्च शिक्षण, महिलांसाठी 24 तास उपलब्ध पोलीस ठाणे, 25 हजार महिलांचा पोलीस दलात समावेश, अंगणवाडी आणि आशा सेविकांना महिन्याला 15 हजार रुपये वेतन आणि सुरक्षा कवच, अशा अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहे.
त्यामुळे आता महिलांनी ठरवायचं आहे की त्यांना कोणत्या पक्षाच्या घोषणा आवडल्या.. तर महिलांनो आणि मुलींनो.. ‘लाडकी बहीण योजना’ किंवा ‘महालक्ष्मी योजना’ यापैकी तुमची पसंती कोणत्या योजनेला ते येथे खाली कमेंट करून नक्की सांगा..