IND vs ENG : भारताचा 4-1 ने मोठा विजय – BCCI ची नवीन योजना, खेळाडूंवर पैशांचा वर्षाव

IND vs ENG Big win for Team India 4 1

IND vs ENG: कसोटी क्रिकेट मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना धर्मशाला येथे पार पडला. या कसोटी सामन्यात भारताने गोलंदाजी आणि त्यांनतर फलंदाजी या दोन्हीही क्षेत्रात उत्कृष्ट प्रदर्शन करत इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभव केला. या कसोटीत संपूर्ण इंग्लंडचा संघ पहिल्यांदा आणि दुसऱ्यांदा फलंदाजी करतांना दोन्हीही डावांत गडगडला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 218 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने 477 धावा करत 259 धावांची आघाडी घेतली. यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ 195 धावांवर गारद झाला. 100 वी कसोटी खेळणाऱ्या अश्विने सर्वाधिक 9 विकेट्स घेत विजयात महत्त्वाची भूमिका निभावली.

ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल

इंग्लंडच्या बॅझबॉलला धूळ चारत या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांची मालिका 4-1 अशी जिंकली. या विजयामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2023-24 ​​च्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. पण त्या सोबतच आता भारताचे PCT गुण वाढून 68.51 झाले आहेत. यापूर्वी 64.58 टक्के गुण होते. WTC च्या चालू चक्रात भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत आणि 6 जिंकले आहेत. भारताने दोन सामने गमावले आणि एक अनिर्णित राहिला आहे.

धर्मशाला कसोटीबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडच्या 218 धावांना प्रत्युत्तर देताना भारताने पहिल्या डावात 477 धावांची मोठी मजल मारली. भारताला 259 धावांची भक्कम आघाडी मिळाली. अनुभवी फिरकी गोलंदाज आर अश्विनच्या गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांवर आटोपला. इंग्लंडकडून जो रूटने (94) सर्वाधिक धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 39 धावा केल्या. अश्विनने आपल्या या 100 व्या कसोटीत ऐतिहासिक खेळी करत तो भारतासाठी कसोटीत सर्वाधिक पाच बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 36व्यांदा ही कामगिरी केली. अश्विनने अनिल कुबळेला (35 बळी) रेकॉर्ड मोडला आहे.

भारताची शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी

तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्मा (103) आणि शुभमन गिल (110) यांच्या शतकांसह भारतीय फलंदाजी क्रमवारीतील अव्वल पाच फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. कुलदीप यादव (30) आणि जसप्रीत बुमराह (20) यांनी खालच्या फळीत नवव्या विकेटसाठी 49 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला मजबूत स्थितीत आणले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील 218 धावांना प्रत्युत्तर देताना भारताचा पहिला डाव शनिवारी तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 477 धावांवर संपला. अशा प्रकारे त्याला पहिल्या डावात 259 धावांची आघाडी मिळाली. प्रत्युत्तरात इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली आणि शंभरावी कसोटी खेळणाऱ्या आर. अश्विनच्या फिरकीसमोर ते पत्त्याच्या घरासारखे कोसळू लागले. दिवसाच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडचा दुसरा डाव 195 धावांवर संपला. अश्विनने 77 धावांत 5 बळी घेत आपली 100वी कसोटी संस्मरणीय केली. अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 516 विकेट्स आहेत.

धर्मशाला मध्ये झालेल्या या कसोटीत कुलदीप सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात दोन बळी घेतले. 5 सामन्यात तब्बल 712 धावांसह यशस्वीने मालिकावीर पुरस्कार पटकावला. यशस्वीने एक द्विशतक, एक शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली. 22 वर्षीय यशस्वीसमोर इंग्लंडने अक्षरक्ष: गुडघे टेकले.

भारतीय क्रिकेट खेळाडूंवर पैशांचा वर्षाव

भारताच्या विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी एक मोठी घोषणा केली आहे की बोर्ड आता ‘टेस्ट क्रिकेट इंसेंटिव योजना'(Test Cricket Incentive Scheme) सुरू करणार आहे, ज्या अंतर्गत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना भरपूर आर्थिक लाभ मिळणार आहेत. ट्विटरवर या नवीन योजनेची घोषणा करताना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी लिहिले की, “मला हे कळवताना अतिशय आनंद होत आहे की पुरुष क्रिकेट संघासाठी ‘टेस्ट क्रिकेट इंसेंटिव योजना’ सुरू करण्यात येत आहे. यामुळे आमच्या खेळाडूंना अधिक आर्थिक लाभ मिळतील. तसेच त्यांच्या करियरला स्थैर्य मिळण्यास मदत होईल.’टेस्ट क्रिकेट इंसेंटिव योजना’ 2022-2023 या हंगामापासून वैध असेल. या योजनेंतर्गत, प्रत्येक सामन्यासाठी 15 लाख रुपये फी व्यतिरिक्त, कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आणखी एक बक्षीस देखील दिले जाईल.”

सध्या कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना एका सामन्यासाठी 15 लाख रुपये फी मिळते, पण आता या खेळाडूंना इंसेंटिव मिळणार आहे. या योजनेत एक महत्त्वाची बाबही जोडण्यात आली आहे. जर एखाद्या खेळाडूने संपूर्ण हंगामात 75 टक्के किंवा त्याहून अधिक सामने खेळले तर त्याला प्रत्येक सामन्यासाठी इंसेंटिव म्हणून 45 लाख रुपये मिळतील. तर प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असलेल्या खेळाडूंना 22.5 लाख रुपये दिले जातील.

जर एखाद्या खेळाडूने 50 टक्के सामने खेळले तर त्याला प्रति सामना 30 लाख रुपये आणि जे खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असतील त्यांना प्रोत्साहन म्हणून 15 लाख रुपये दिले जातील. जर एखाद्या खेळाडूने संपूर्ण हंगामात 50 टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळले तर त्याला कोणतेही इंसेंटिव दिले जाणार नाही. अशी ही नवीन योजना आहे. म्हणजेच एकप्रकारे 75 टक्के किंवा त्याहून अधिक कसोटी सामने खेळनाऱ्या भारतीय क्रिकेट खेळाडूंवर आता BCCI पैशांचा वर्षाव करणार आहे.

(ind vs eng, india won 4-1, team india, cricket, india vs england, bcci, test cricket incentive scheme,)

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top