Why Do Angioplasty After Heart Attack

हार्ट अटॅक नंतर Angioplasty का करतात? याचे फायदे आणि तोटे काय? Heart Attact येऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी? संपूर्ण माहिती

Contents hide

Heart Attact Angioplasty: काही दिवसांपूर्वीच मराठी मधील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Actor Shreyas Talpade) याला वयाच्या अवघ्या 47 व्या वर्षी हृदयविकाराचा (Heart Attact) झटका आला. यांनतर हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची बातमी आपण ऐकली. लवकरात लवकर आणि वेळेत ही Angioplasty झाल्याने Heart Attact आलेल्या रुग्णाचा जीव वाचतो. पण ही अँजिओप्लास्टी (Angioplasty) म्हणजे नेमकं काय? याबद्दल अनेकांना अजूनही माहिती नाही. खरंतर आजकाल अनेकांना खूप कमी वयातच हार्ट अटॅक येऊ लागलाय. यामुळे अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहे. प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) आणि बिग बॉसचा विजेता अभिनेता सिध्दार्थ शुक्ला (Actor Sidharth Shukla) यांचेही अत्यंत कमी वयात हार्ट अटॅकमुळे निधन झाले होते. तसेच अनेक व्हायरल व्हिडीओ मध्ये आपण बघितले आहे की जिम मध्ये व्यायाम करतांना सुद्धा अनेकांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे तुमची बॉडी दिसायला कितीही चांगली असली असली किंवा दिसायला तुम्ही एकदम फिट दिसत असला, तरीही तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो. यामागचे अनेक कारणे आहेत. पण हार्ट अटॅकची लक्षणे कळताच योग्य वेळेत जर Angioplasty केली तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. म्हणूनच आज आपण Angioplasty म्हणजे काय? ते कसे करतात? त्याचा फायदा काय? तसेच Heart Attact येऊच नये यासाठी काय काळजी घेता येईल? याबद्दल थोडक्यात माहिती बघूया.

अँजिओप्लास्टी कोणत्या रुग्णाची होते (Angioplasty surgery is performed on which patient?)

Heart Attact आलेल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी तत्काळ अँजिओप्लास्टी शस्रक्रिया केली जाते. Angioplasty चा उपयोग कोरोनरी धमनी रोग, परिधीय धमनी रोग, कॅरोटीड धमनी रोग आणि तीव्र धमनी रोगामध्ये केला जाऊ शकतो. ज्यांना छातीत दुखतंय किंवा Heart Attact सारखी समस्या जाणवतेय, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार घेतल्यास, जर डॉक्टरांना Heart Attact असल्याचे निदान झाल्यास ते रुग्णाची ही Angioplasty शस्त्रक्रिया करू शकतात. Heart Attact आल्यानंतर एका तासाच्या आत रुग्णावर अँजिओप्लास्टी केल्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. पण या अगोदर रुग्णाची अँजिओग्राफी (Angiography) केली जाते. Angiography ही एक प्रकारचा एक्स-रे प्रक्रिया आहे, जीचा रक्तवाहिन्या तपासण्यासाठी वापर केला जातो. याद्वारे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे बनलेले प्लेक कुठे आहे हे ओळखले जातात. प्लेक हे चरबी, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम आणि इतर तत्सम पदार्थांनी बनलेले एक घनदाट चिकट वस्तुमान आहे जे रक्तप्रवाहात व्यत्यय आणून धमनीच्या लुमेनमध्ये जमा होतात.

रुग्णाची Angiography करून प्लेक कुठे आहे हे ओळखल्या नंतर रक्त प्रवाह सुधारण्यासाठी किवा सुरळीत करण्यासाठी रक्तवाहिन्यांमधून हे प्लेक काढून टाकण्यासाठी Angioplasty शस्त्रक्रिया केली जाते. अँजिओप्लास्टीला ‘परक्यूटेनियस कोरोनरी इंटरवेंशन’ (PCI – Percutaneous Coronary Intervention) असेही म्हणतात. एकंदरीतच अँजिओप्लास्टी हा बंद झालेल्या धमन्या उघडण्याचा एक चांगला मार्ग आहे.

अँजिओप्लास्टीमध्ये काय केले जाते?

Angioplasty ही कोरोनरी धमनीच्या आजारामुळे धमन्या उघडण्यासाठी वापरली जाणारी एक कमी धोक्याची शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे. हे ओपन-हार्ट सर्जरीशिवाय हृदयाच्या स्नायू मधील रक्त प्रवाह सुरळीत करते. Angiography ही एक्स-रे प्रक्रिया केल्यानंतर ज्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी आणि कोलेस्टेरॉलचे प्लेक बनलेले आहे तेथे ही Angioplasty शस्त्रक्रिया केली जाते. जोखीम कमी करण्यासाठी या प्रक्रियेदरम्यान रुग्णाचे रक्त पातळ केले जाते. या शस्त्रक्रिया प्रक्रियेमध्ये पाय, हात किंवा मनगटातील रक्तवाहिन्यावरील त्वचेत लहाने छेद करून एक लहान, पातळ ट्यूब थ्रेड केली जाते. या अँजिओप्लास्टीला 45 मिनिटे ते काही तास लागू शकतात. Angioplasty मध्ये बायपास सर्जरीपेक्षा कमी धोके असतात.

Angioplasty करतांना रक्तवाहिनीमध्ये एक लांब आणि पातळ अशी ट्यूब घातली जाते आणि धमनी उघडण्याचा प्रयत्न केला जातो. यानंतर एक लहान बलून कॅथेटर वापरले जाते जी ब्लॉक केलेल्या रक्तवाहिनीमध्ये घातली जाते, ज्यामुळे ती रुंद होण्यास आणि हृदयाला रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते. कॅथेटरच्या आतल्या टोकाला एक फुगा असतो आणि कॅथेटर रक्तवाहिनीत गेल्यावर तो फुगवला जातो. कॅथेटर बसल्यानंतर हृदयाच्या धमनीच्या अरुंद भागावर हा फुगा फुगवला जातो. हे धमनीच्या बाजूंच्या विरूद्ध चरबी, प्लेक किंवा रक्ताची गुठळी दाबते आणि रक्त वाहण्यास अधिक जागा बनवते. यामुळे रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत होतो. बर्‍याच प्रकरणांनमध्ये डॉक्टर Angioplasty नंतर रक्तवाहिन्यांमध्ये ‘कोरोनरी आर्टरी स्टेंट’ बसवतात. हे स्टेंट रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह पुन्हा सुरळीत करण्याचे कार्य करतात.

अँजिओप्लास्टीचे तीन प्रकार (Three types of angioplasty)

Angioplasty चे तीन प्रकार आहेत. बलून अँजिओप्लास्टी (Balloon Angioplasty), लेसर अँजिओप्लास्टी (Laser Angioplasty) आणि एथेरेक्टॉमी अँजिओप्लास्टी (Atherectomy Angioplasty).

बलून अँजिओप्लास्टी (Balloon Angioplasty)

बलून अँजिओप्लास्टी मध्ये हात किंवा मांडीजवळ एक छोटीशी चीर करून कॅथेटर नावाची पातळ नळी ब्लॉक झालेल्या धमनीमध्ये घातली जाते. एक्स-रे किंवा व्हिडीओच्या मदतीने डॉक्टर आत जाणाऱ्या नळ्यांचे निरीक्षण करतात. ब्लॉक झालेल्या धमनीपर्यंत पोहोचल्यानंतर कॅथेटर फुगवला जातो. हा फुगा (Balloon) ब्लॉकेज हटवून धमनी रूंद करतो आणि रक्त प्रवाह सुरळीत करतो.

लेझर (Laser Angioplasty) आणि एथेरेक्टॉमी अँजिओप्लास्टी (Atherectomy Angioplasty)

लेसर अँजिओप्लास्टीमध्ये सुद्धा कॅथेटर वापरला जातो. पण यात बलून ऐवजी लेसरचा वापर केला जातो. यात लेसरला ब्लॉकेजपर्यंत नेले जाते आणि नंतर ब्लॉक धमनी बाष्पीकरणाने मोकळी करण्याचा प्रयत्न केला जातो. जेव्हा बलून किंवा लेसर अँजिओप्लास्टीद्वारे कोणतेही हार्ड ब्लॉकेज काढला जाऊ शकत नाही, तेव्हा एथेरेक्टॉमी शास्त्रक्रिया वापरली जाते.

अँजिओप्लास्टीची किंमत किती आहे? (How much does angioplasty cost in India?)

अँजिओप्लास्टीची प्रक्रिया आणि त्यात समाविष्ट असलेल्या स्टेंटची किंमत प्रत्येक देशात वेगवेगळी ठरवण्यात आली आहे. भारतात या स्टेंटची किंमत 10,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान असते. साधारणपणे स्टेंटची किंमत हॉस्पिटल नुसार बदलते. सरकारी हॉस्पिटलमध्ये स्टेंटची किंमत कमी असली तरी ती बसवण्याची किंमत खूपच जास्त आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये तर संपूर्ण Angioplasty ची किंमत 2 ते 3 लाखांच्या दरम्यान येते. भारत सरकारने देशभरात स्टेंटची किंमत निश्चित केली असली तरी त्याची किंमत हॉस्पिटलनुसार वेगळी घेतली आहे.

अँजिओप्लास्टीचे फायदे (Advantages of angioplasty)

‘सोसायटी फॉर कार्डियोव्हास्क्यूलर अँजियोग्राफी अँड इंटरव्हेंशन’ यांच्या एका अहवालानुसार योग्य वेळेत Angioplasty केल्यास एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवला जाऊ शकतो. शरीरातील ब्लॉक रक्तवाहिन्यांमध्ये रक्त प्रवाह परत सुरळीत करण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. Angioplasty जितक्या लवकर होते, हृदयाच्या स्नायूला तितकेच कमी नुकसान होते. Heart Attact मुळे श्वास लागणे किंवा छातीत दुखणे या समस्या निर्माण होतात. पण Angioplasty मुळे या समस्यांतून आराम मिळतो. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता आणि Heart Attact चा धोका कमी होऊ शकतो.

अँजिओप्लास्टीचे काही धोके (Some risks in angioplasty)

प्रत्येक वैद्यकीय प्रक्रियेमध्ये काही धोकेही असतात. अँजिओप्लास्टीमध्ये वापरले जाणारे एनेस्थेटिक, डाय किंवा इतर काही पदार्थांपासून रुग्णाला अॅलर्जी होऊ शकते. याव्यतिरिक्त Angioplasty करण्याआधी जोखीम कमी करण्यासाठी या प्रक्रियेदरम्यान रुग्णाचे रक्त पातळ केले जाते. पण यामुळे ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्यांमधे Angioplasty करतांना रक्तस्त्राव होऊ शकतो, तसेच गाठ किंवा जखम होण्याची समस्या देखील निर्माण होऊ शकते. Angioplasty शस्त्रक्रियेनंतर हृदयाचा ठोका अनियमित होण्याचा धोका देखील असतो. रक्तवाहिन्या किंवा हार्ट व्हॉल्व्हचे नुकसान देखील होऊ शकते. हृदयविकाराचा धोका कमी होण्याऐवजी तो वाढूही शकतो. तसेच अँजिओप्लास्टी आणि स्टेंट प्लेसमेंट दरम्यान वापरल्या जाणार्‍या डाय मुळे मूत्रपिंड (kidney) खराब होऊ शकते. विशेषत: ज्यांना आधीच किडनीच्या समस्या आहे त्यांच्यासाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते, त्यामुळे अशा रुग्णांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी लागते. Angioplasty करतांना शरीरात संसर्ग होण्याचा धोकाही असतो.

अँजिओप्लास्टीनंतर आरोग्याकडे विशेष लक्ष कसे द्यावे? (Special attention to health after angioplasty?)

अँजिओप्लास्टीनंतर आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. डॉक्टरही रुग्णाला आरोग्याकडे पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यायला सांगतात. कारण अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिये नंतर नेहमीपेक्षा जरा वेगळी जाणीव निर्माण होते. शारीरिक बदलांशिवाय रुग्णाला बरेच मानसिक बदल सुद्धा जाणवतात. पण ते लवकरात लवकर स्वीकार करणे अतिशय महत्त्वाचे आहे. तसेच Angioplasty नंतर कोणत्याही प्रकारची थोडी जरी अस्वस्थता जाणवली तर लगेचच संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधा.

Angioplasty नंतर काही पथ्ये पाळणे गरजेचे असतात. विशेषतः पौष्टिक आरोग्यपूर्ण आहार घेणे, रोज रात्री पुरेशी झोप घेणे, नियमितपणे व्यायाम करणे, वजन कमी ठेवणे, धूम्रपान पूर्णपणे बंद करने, नैराश्यात न राहणे अशा प्रकारे काळजी घेणे गरजेचे आहे. याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

धूम्रपान करणे हानिकारक

धूम्रपान करणे हानिकारक आहे असं अनेकजण आपल्याला नेहमी सांगत असतात. आपण TV वर यासंबंधी अनेक जाहिराती सुद्धा बघतो. तसेच जे धूम्रपान आपण करत असतो त्या वस्तूच्या पॅकेटवर सुद्धा ‘धूम्रपान करणे हानिकारक आहे’ असं लिहिलेलं असतं. एवढं सगळं असून सुद्धा आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि धूम्रपान करणे सुरूच ठेवतो. मग आरोग्याच्या समस्या निर्माण होणं हे तर साहजिकच आहे. त्यामुळे जरी अजून तुम्हाला Heart Attact आलेला नसेल तरी वेळीच सावध व्हा आणि धूम्रपान करणे आताच थांबवा.

Heart Attact नंतर Angioplasty यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला पूर्वीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेतली गेली पाहिजेत. जर तुम्हाला धूम्रपान करण्याचे व्यसन असेल तर ते पूर्णपणे सोडले पाहिजे. धूम्रपान हे फक्त तुमच्या फुफ्फुसांनाच हानी पोहोचवत नाही तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांना देखील हानी पोहोचवते आणि रक्तदाबाच्या व कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये वाढ करते. त्यामुळे धूम्रपान पूर्णपणे सोडले पाहिजे.

संतुलित आहार घेणे गरजेचे

Angioplasty नंतर चांगला आणि संतुलित आहार घेतला पाहिजे. विशेषतः आहारामधील मिठाचे आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी करा. तुमच्या आहारामध्ये मटन, मासे (ओमेगा 3 फॅटी ऍसिड), पूर्ण धान्य, दूध आणि दुधाचे पदार्थ (कमी फॅट असलेले), आरोग्यपूर्ण फॅट्स (नट्स, बिया, अव्होकॅडो), पाणी आणि इतर पदार्थांचा समावेश करू शकता. साखरयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा. जीवनसत्वे, तंतुमय पदार्थ, खनिजे आणि अँटीऑक्सीडेंट्स या पोषण घटकांनी तुमचा आहार संतुलित आहे का याची खात्री करून घ्या. Angioplasty नंतर तुमच्या धमन्यांमधील रक्त प्रवाह हा एकदम सुरळीत झालेला असतो पण पुन्हा क्षार साठून त्यांचा अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते. यामुळेच योग्य संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. तसेच Angioplasty शस्रक्रिया झाल्यानंतर रुग्णाने पुढे योग्य संतुलित आहार कोणता घ्याचा याबद्दल डॉक्टर देखील योग्य मार्गदर्शन करतात.

लठ्ठपणा कमी करा

तुम्हाला लठ्ठपणा असेल आणि तुम्ही जर काही किलो वजन कमी केले तर तुमची कोलेस्टेरॉल, रक्तदाब आणि रक्तामधील साखरेची वाढलेली पातळी कमी होण्यास मदत होईल. त्यामुळेच योग्य संतुलित आहार आणि योग्य व्यायाम याद्वारे तुम्ही तुमचा लठ्ठपणा कमी करू शकतात. अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही हा लठ्ठपणा कमी करा. व्यायाम करतांना तर तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. नाहीतर व्यायाम करतांना सुद्धा तुम्हाला Heart Attact येऊ शकतो. म्हणूनच व्यायाम करतांना काय व कशी काळजी घ्यायची याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

जिम मध्ये व्यायाम करतांना Heart Attact का येतो? (Why does heart attack occur while exercising in the gym?)

रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. पण आपण याविषयी अगोदरही चर्चा केली होती की अनेक तरुणांना जिम मध्ये व्यायाम करतांना Heart Attact येतो. यात काहींचे निधन सुद्धा झाले आहे. याबद्दलचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे. या प्रकारामुळे काही जन तर आता जिम मध्ये व्यायाम करायला पण घाबरतात. मग हे असं का होतं? तरुणांना जिम मध्ये व्यायाम करतांना Heart Attact का येतो? तर याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती बघूया.

जिम मध्ये व्यायाम करतांना अनेक तरून फक्त बॉडी बनवण्याच्या उद्देशाने खूप उतावळे होऊन व्यायाम करतांना दिसतात. पण ही व्यायाम करण्याची योग्य पद्धत नाही. शेवटी आपल्या शरीराचेही काही नियम असतात. त्यामुळे जिम प्रशिक्षकाच्या सल्ल्याने आणि योग्य पद्धतीनेच व्यायाम केला गेला पाहिजे. व्यायाम करण्याची योग्य पद्धत अशी की व्यायाम सुरू करण्यापूर्वी 10 मिनिटे वार्म अप करायलाच हवा, हे फार गरजेचे आहे. यामुळे तुमच्या हृदयाचे ठोके हळूहळू वाढतील आणि व्यायाम करतांना हृदयावर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही. वार्म अप हा तुमच्या स्नायूंना देखील व्यायाम करण्यासाठी तयार करतो किंवा सक्रीय करतो. त्यामुळे व्यायाम करण्याआधी वार्म अप केलाच पाहिजे. जर तुम्ही व्यायाम करण्याआधी वार्म अप केला नाही आणि लगेचच व्यायाम करायला सुरुवात केली तर तुमच्या हृदयाचे ठोके अचानक जोरात वाढू लागतील. यामुळे हृदयावर ताण येईल आणि तुम्हाला तेथेच Heart Attact येण्याची शक्यता सुद्धा असते. म्हणूनच अगोदर वार्म अप करणे गरजेचे आहे.

तसेच व्यायाम करून झाल्यानंतर स्ट्रेचिंग आणि काही वेळ सावकाश चालने हे प्रकार करावे. यामुळे तुमचे शरीर व हृदय पुन्हा शिथिल करण्यास खूप मदत होते. तर व्यायाम करतांना अशा काही गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्हाला Heart Attact येणार नाही. आणि व्यायाम केल्याने उच्च रक्तदाब, रक्तामधील कोलेस्टेरॉलची उच्च पातळी, मधुमेह आणि लठ्ठपणा इत्यादी प्रकारचे विकार दूर ठेवण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळेच नियमितपणे व्यायाम करा आणि स्वस्थ राहा.

रात्री पुरेशी झोप घेणे आवश्यक

आजकाल अनेक तरुणांना Heart Attact येण्याचे असेही एक कारण समोर आले आहे की सध्याची बदललेली जीवनशैली. यात अनेक तरुण आरोग्याकडे विशेष लक्ष देत नाही. संध्याकाळच्या वेळी दारू वगैरेच्या पार्ट्या. कधी कधी तर या दारू पार्ट्या रात्रभर सुरु असतात. यामुळे रात्री पुरेशी झोप मिळत नाही. या अनेक कारणांमुळे शरीरावरील आणि हृदयावरील तान वाढत जातो. परिणामी तरुणपणातच Heart Attact सारख्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागते. म्हणूनच व्यसन न करता रात्री पुरेशी झोप घेणे हे सर्वांसाठी अत्यंत आवश्यक आहे.

Heart Attact नंतर Angioplasty झालेल्या रुग्णांमध्ये अनेक मानसिक बदल सुद्धा होतात. त्यामुळे कधी-कधी रात्री पुरेशी झोप लागत नाही. किंवा काही रुग्ण तर Angioplasty नंतर सुद्धा धूम्रपान करणे सुरूच ठेवतात. यामुळेही काही रुग्णांमध्ये निद्रानाशाची समस्या दिसून येते. तर काही रुग्ण संध्याकाळच्या वेळी दारू, कॉफी आणि अति प्रमाणामध्ये जेवण घेतात. यामुळेही निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते. अनेक रिसर्चनंतर असे सिद्ध झाले आहे की Angioplasty झालेल्या रुग्णांमध्ये निद्रानाशाची समस्या असेल तर त्यांना 4 वर्षांमध्ये पुन्हा एकदा Angioplasty शस्त्रक्रिया करावी लागते. त्यामुळे पुन्हा Angioplasty करायची नसेल तर रात्री पुरेशी झोप घेणे अतिशय गरजेचे आहे. यासाठी धूम्रपान करणे बंद करा, चहा-कॉफी संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस घेऊ नका, आणि रात्री अति प्रमाणामध्ये जेवण करणे टाळावे.

चहा-कॉफी हे मुळात भारतीय लोकांसाठी नाहीच. इंग्रजांसाठी चहा-कॉफी हे अमृत आहे पण भारतीय लोकांसाठी ते विष आहे. याविषयी सविस्तर माहिती आम्ही आमच्या एका आर्टिकल मध्ये दिली आहे. त्यासाठी ‘Dangerous Side Effects of Tea: चहा पिताय, त्याअगोदर हे वाचा – होतील हे गंभीर आजार – चहा भारतीयांसाठी नाहीच’ हा आर्टिकल नक्की वाचा.

नैराश्यात राहू नका

अनेक लोक हे काहीना काही कारणांमुळे नेहमी नैराश्यात असतात. या नैराश्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत विचित्र प्रकारचे बदल होतात. ते आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाही. जास्त धूम्रपान करतात. काहीजण तर दुःख विसरण्यासाठी आम्ही दारू पितो असंही सांगतात. पण दारू मुळे दुःख कधीही विसरले जात नाही. उलट यामुळे आपण आपल्याच शरीराचे खूप मोठे नुकसान करतो. आणि भविष्यात दारूचे व्यसन लागून ती सुटणे फार अशक्य बनते. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यापैकीच एक समस्या म्हणजे Heart Attact येणे.

त्यामुळेच भविष्यात आरोग्याच्या अनेक समस्या टाळायच्या असतील तर आता नैराश्यात राहू नका. जर एखाद्या गोष्टीचे दुःख किंवा त्रास होत असेल तर त्यातून बाहेर पडण्याचा चांगला आणि सकारात्मक मार्ग शोधा. स्वतःच्या मनाला चांगल्या कामात किंवा इतर चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून घ्या म्हणजे काही वेळाने किंवा काही दिवसाने दुःख दूर होईल आणि तुम्हाला नैराश्य जाणवणार नाही.

यात अशीही एक गोष्ट समोर आली आहे की Angioplasty नंतर सुद्धा अनेक रुग्ण नैराश्यात असतात. कारण Heart Attact नंतर Angioplasty झालेल्या रुग्णांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल सुद्धा होतात. हे बदल लवकरात लवकर स्वीकारने गरजेचे असतात. पण काही रुग्णांना हे जमत नाही. त्यांना पुन्हा सामान्य होणं फार अवघड जातं आणि मग यातूनच त्यांना नैराश्य येतं. जर या नैराश्यावर वेळीच उपचार केले नाहीत तर ते त्या रुग्णाचे आरोग्य पूर्णपणे खराब करेते. त्यामुळेच Angioplasty झालेल्या रुग्णाने किंवा त्याच्या परिवाराने त्या रुग्णाला लवकरात लवकर नैराश्यातून बाहेर काढणे फार गरजेचे आहे. यासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Angioplasty बद्दलच्या माहितीसाठी खालील हा व्हिडिओ बघा:

(Why Do Angioplasty After Heart Attack? What are the advantages and disadvantages? What should be done to avoid heart attack? Complete information)

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही, या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top