HMPV: चीनमध्ये HMPV या व्हायरसचा उद्रेक झाल्याने जगभरातील सर्व देशांची पुन्हा एकदा धाकधूक वाढवली आहे. सोमवारी भारतातील बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसचे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. पण आता महाराष्ट्रामधेही या व्हायरसचा शिरकाव झाला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) एचएमपीव्हीची लागण झालेले दोन रुग्ण आढळून आले आहेत, येथे दोन लहान मुलांचा HMPV अहवाल पॉझिटिव्ह आला होता. सात वर्षांचा मुलगा आणि 13 वर्षांच्या मुलीला HMPV ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन्ही मुलांमध्ये खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसत होती. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही आणि दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
त्यामुळेच आरोग्य विभागाकडून असं सांगण्यात आले आहे की HMPV या व्हायरसला जास्त घाबरण्याची गरज नाही, पण ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे. त्यांनी अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, उदा. लहान मुले आणि वयस्कर व्यक्ती.
Human Metapneumovirus (HMPV) या विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या या काही मार्गदर्शक सूचना थोडक्यात बघूया.. आणि या सूचनांचे आपण सर्वांनीच पालन करायचे आहे.
काय करावे
- खोकताना किंवा शिंकताना आपलं तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा.
- साबण, पाणी किंवा अल्कोहोलवर आधारित सॅनिटायझरनं आपले हात वारंवार धुवावेत.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा.
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी व्हेंटीलेशन होईल म्हणजेच हवा खेळती राहील याची दक्षता घ्या.
काय करू नये
- खोकलेल्या किंवा शिंकलेल्या हातांनी हस्तांदोलन करणं टाळावं. यामुळे संसर्ग लगेच पसरतो.
- टिश्यू पेपरचा वापर केल्यानंतर तो कचरा पेटीत टाकावा. वारंवार एकाच टिश्यू पेपरचा किंवा रुमालाचा वापर करणं टाळावं.
- आजारी लोकांपासून लांब राहावं. व्हायरल इन्फेक्शन झालेलं असल्यास शक्यतो रुग्णाच्या जवळ जाऊ नये. शक्य असल्यास त्याला घरातच आयसोलेट करावं.
- डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करू नये.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये.
तर आरोग्य विभागाने या काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे, त्यांचे आपण सर्वांनीच पालन करणे गरजेचे आहे. विशेषतः ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमजोर आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी.
