Calcium Deficiency: कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे, आजार आणि उपाय, कॅल्शियम वाढवण्यासाठी या पदार्थांचे करा सेवन

Calcium Deficiency: अनेक लोकांना एका विशिष्ट वयानंतर किंवा काहींना फार कमी वयातच अचानक थकवा आल्यासारखे वाटते, हात पाय दुखायला लागतात, थोडंसं काम केलं तरीही गळून गेल्यासारखे होते, तसेच लहान मुले आवश्यक त्या प्रमाणात उंच होत नाही हे सर्व कशामुळे होतं? अशा प्रश्न अनेकांना पडतो. पण हे सर्व आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी झाल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आहेत. मग शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेमुळे कोणते आजार होतात?, याची लक्षणे काय? आणि ही कॅल्शियमची कमतरता कशी दूर करायची याविषयी आज आपण थोडक्यात माहिती बघूया. (Calcium Deficiency Symptoms, Diseases and Remedies, Consume these foods to increase calcium)

शरिरासाठी कॅल्शियम महत्वाचा घटक

कॅल्शियम आपल्या शरिरासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आपल्या दातांमध्ये तसेच हाडांमध्ये 99 टक्के कॅल्शियम असतं, आणि उरलेलं 1 टक्के कॅल्शियम मांसपेशींच्या आकुंचन आणि प्रसरणाने शरिरातील अन्य भागांकडून मेंदूपर्यंत संदेश पाठवण्याचे काम करतं. म्हणूनच आपल्या शरीराला कॅल्शियमची अत्यंत गरज असते.

जर आपल्या शरिरात कॅल्शियम कमी पडू लागले तर आपले शरीर हे हाडांमधील कॅल्शियम काढून त्याचा वापर करते. सुरवातीला आपल्या शरिरात कॅल्शियमची कमतरता आहे हे आपल्याला लवकर कळत नाही, मात्र दीर्घ काळ ही परिस्थिती कायम राहिल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात.

शरीर कॅल्शियम कसे घेते?

आपले शरीर कॅल्शियम तयार करू शकत नाही. आपण जे अन्न खातो किंवा जे पूरक आहार घेतो त्यातूनच आपल्याला कॅल्शियम मिळते. बहुतेक वेळा जेव्हा आपल्या शरीरात पुरेसे कॅल्शियम असते, तेव्हा कॅल्सीटोनिन नावाचे हार्मोन कार्य करते जे मूत्रपिंडांना मूत्राद्वारे ते काढून टाकण्यास आणि हाडांमधून कॅल्शियम सोडणे थांबवण्यास सूचित करते.

परंतु रक्तातील कॅल्शियमची लेव्हल कमी झाल्यास पॅराथायरॉइड हार्मोन हाडांना हाडांमधून कॅल्शियम रक्तप्रवाहात सोडण्याचे संकेत देते, त्याच वेळी ते मूत्रपिंडाला लघवीद्वारे कमी कॅल्शियम सोडण्यास सूचित करते. परंतु हे उधार घेतलेले कॅल्शियम एका विशिष्ट वयानंतर परत जात नाही. आणि हाडांमधून कॅल्शियम घेतल्याने हाडे कमकुवत होतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे गंभीर आजार

जर एखाद्या व्यक्तीमध्ये दीर्घकाळ कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याला हायपोकॅल्सेमिया (hypocalcaemia), मोदीबिंदू, ऑस्टियोपेनिया, ऑस्टियॉपोरोसिस, रिकेट्स, टेटनी, ऑस्टियोमेलासिया, रुमेटाइड, अर्थारायटीस, मोनोपॉजच्या समस्या, ब्लड प्रेश आणि हार्ट अटॅक यासारखे गंभीर आजार होऊ शकतात.

नवजात मुलांमध्ये हायपोकॅल्सेमिया होतो. हे बहुतेकदा जन्मानंतर पहिल्या 2 दिवसात उद्भवते. यासाठी मातेला असणारा मधुमेह, अयोग्य स्तनपान, वयापेक्षा कमी दिसणे, हे कारणे असू शकतात.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याची काही लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ओळखून वेळीच त्यावर योग्य ते उचार केल्यास भविष्यात होणाऱ्या गंभीर आजाराचा धोका टाळता येईल. कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे खाली दिलेली आहे.

  • केस तुटणे किंवा गळणे
  • कमकुवत हाडे, सांधेदुखी, गुडघ्यांमधून कट कट आवाज
  • हाडे सहज फ्रॅक्चर होने
  • दात कमकुवत होणे, दातांमध्ये कीड लागणे, हिरड्यांचे आजार
  • निद्रानाश, नैराश्य, भीती आणि मानसिक तणाव
  • स्मृती भ्रंश, विसरभोळेपणा
  • स्नायू दुखणे, मसल्स क्रेंप
  • नखे तुटणे
  • भूक मंदावणे
  • श्वासोच्छवासाच्या समस्या
  • बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटदुखी
  • तीव्र थकवा, कमजोरी आणि अशक्तपणा
  • एलर्जीचा त्रास
  • उच्च रक्तदाब
  • त्वचा रुक्ष होणे
  • रोग प्रतिकारशक्ती कमजोर होणे
  • शरीर सुन्न होणे, हातपाय मुंग्या येणे, फिट येणे

ही काही कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे आहेत. पण ही लक्षणे दिसणे म्हणजे गंभीर आजार नाही. वेळीच यावर उपाय केल्यास आणि कॅल्शियमची कमतरता दूर केल्यास आपण गंभीर आजारापासून सुरक्षित राहू शकतो.

आपण कॅल्शियमच्या कमतरतेवर कशी मात करू शकतो याबद्दल माहिती बघूया, पण त्या अगोदर कॅल्शियमशी संबंधित काही महत्त्वाचे घटक समजून घेऊ.

शरीराला दररोज किती कॅल्शियमची आवश्यकता असते?

  • एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी : दररोज 250-300 मिग्रॅ.
  • मुलांसाठी : दररोज 700-1000 मिलीग्राम
  • किशोरांसाठी : दररोज 1300 मिग्रॅ
  • प्रौढ आणि वृद्धांसाठी : दररोज 1000-1300 मिग्रॅ

कॅल्शियमच्या कमतरतेसाठी चाचणी / टेस्ट

आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण रक्त तपासणी करू शकता – सीरम कॅल्शियम लेवल.

प्रौढांसाठी सामान्यतः कॅल्शियम पातळी 8.8 ते 10.4 mg/dL असते. पण जर जर तुमची कॅल्शियम पातळी 8.8 mg/dl पेक्षा कमी असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे.

कॅल्शियमच्या कमतरतेवर उपचार

कॅल्शियमच्या कमतरतेवर आपण काय उपाय आणि काय उपचार करू शकतो याबद्दलची माहिती प्रसिद्ध न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास कुमार (Neuro & Spine surgeon Dr Vikas Kumar) यांनी त्यांच्या सोशल मिडिया पेजवर दिली आहे. यात डॉ. विकास कुमार यांनी शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेनुसार A,B आणि C अशा 3 प्रकारांत त्यावरील उपचारांची विभागणी केली आहे.

A. डायटमध्ये बदल

ज्या खाद्य पदार्थांत कॅल्शियमची मात्रा अधिक आहे त्यांचे सेवन करून आपण शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढू शकतो.

या पदार्थांच्या सेवनाने आपण कॅल्शियमची पातळी सुधारू शकतो

  • दूध (Milk)
  • मासे (Fish)
  • बदाम (Almond)
  • संत्र्याचा रस (Orange Juice)
  • चीज (Cheese)
  • दही (Yogurt)
  • ब्रोकोली (Brocolli)
  • अंजीर (Fig)
  • व्हे प्रथिने (Whey Protein)
  • थोडा वेळ उन्हात बसा
  • दुधापासून बनवलेल्या उत्पादनांचे नियमित सेवन करा
  • इतर (चीया सीड्स, सोयाबीन, मोहरी, काही डाळी आणि कडधान्ये, फोर्टिफाइड पदार्थ, सोया दूध इ.)

या काही खाद्य पदार्थांचे सेवन करून आपण आपल्या शरीरातील कॅल्शियमची पातळी सुधारू शकतो.

B. कॅल्शियम सप्लिमेंट्स

वरील खाद्य पदार्थांच्या सेवनाने देखील शरीरातील कॅल्शियमची पातळी व्यवस्थित सुधारत नसेल किंवा ती मोठ्या प्रमाणात कमी असेल तर अशा वेळी कॅल्शियम सप्लिमेंट्स (Calcium supplements) घेणे आवश्यक असते. डॉक्टर रुग्णांना त्यांच्या गरजेनुसार हे कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्यास सांगतात. त्यामुळे कॅल्शियम सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

खाली दिलेले हे काही कॅल्शियम सप्लिमेंट्स आहे

  • कॅल्शियम सायट्रेट
  • कॅल्शियम फॉस्फेट
  • कॅल्शियम कार्बोनेट – (हे फार महाग नाही, हे सर्वात सामान्यपणे लिहून दिलेले मीठ आहे, यात कॅल्शियमची कमतरता पूर्ण होईपर्यंत दररोज एक गोळी दिली जाते)

कॅल्शियमसोबतच डॉक्टर व्हिटॅमिन डी ची पातळी संतुलित ठेवण्याचा सल्ला देऊ शकतात. कारण शरीरात कॅल्शियमची पातळी चांगली ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाची भूमिका बजावते, त्यामुळे व्हिटॅमिन डीच्या गोळ्याही दिल्या जातात.

कॅल्शियम सप्लिमेंटचे दोन भाग करून घ्या आणि कॅल्शियम चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी जेवणानंतर घ्या.

C. कॅल्शियम इंजेक्शन

आहारात बदल करून किंवा कॅल्शियम सप्लिमेंट्सचे उपचार घेऊन देखील शरीरातील कॅल्शियमची पातळी सुधारत नसेल तर कॅल्शियम इंजेक्शनची मदत घेतली जाऊ शकते. कृपया हे उपचार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.

कॅल्शियम सप्लिमेंटमुळे फायद्याऐवजी नुकसान सुद्धा होऊ शकते

कॅल्शियम हे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. म्हणूनच आजकाल लोक कॅल्शियम सप्लिमेंट्स घेण्यावर भर देत आहेत, परंतु तज्ञांच्या मते, सध्या लोक जितकी कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतात तितकी शरीराला त्याची गरज नसते. सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार, शरीरातील कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, सप्लीमेंट ऐवजी कॅल्शियमयुक्त पदार्थांचे सेवन करणे अधिक चांगले आहे. BBC च्या बातमीनुसार, जर्मनीतील काही संशोधकांचे म्हणणे आहे की, जे लोक कॅल्शियमसाठी स्वतंत्र औषधे घेतात त्यांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असतो.

हायपरकॅल्सेमिया

आपण कॅल्शियमच्या कमतरतेवर उपाय आणि उपचार बघितले, पण काहींच्या शरीरात कॅल्शियमची लेव्हल सामान्यपेक्षा जास्त असते. याला हायपरकॅल्सेमिया (hypercalcaemia) असे म्हणतात. यात रक्तातील जास्त प्रमाणात असलेल्या कॅल्शियममुळे तुमची हाडे अशक्त होऊ शकतात, किडनी स्टोन तयार होतो आणि तुमच्या हृदयावरही परिणाम होतो. जेव्हा शरीरात कॅल्शियम जास्त प्रमाणात जमा होते, तेव्हा मूत्रपिंड हे सहजपणे फिल्टर करू शकत नाही. अशावेळी त्या व्यक्तीला मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.

हायपरकॅल्सेमिया होण्याचे कारण हायपरथायरॉईडीझम, सप्लिमेंट्सचे जास्त सेवन किंवा इतर मेडिकल परिस्थिती हे जबाबदार असू शकते.

हायपरकॅल्सेमियाची लक्षणे – जास्त तहान लागणे आणि वारंवार लघवी होणे, स्नायू दुखणे आणि हाडे दुखणे, तोंड कोरडे पडणे, थकवा, हृदयाच्या समस्या, पोट खराब होणे, बद्धकोष्ठता, खूप काळ डोकेदुखी ई.

तर अशा प्रकारे कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे, आजार, उपाय आणि उपचार याबद्दलची माहिती आपण बघितली. यासोबतच कॅल्शियमच्या आधिक्यामुळे होणारे परिणाम आणि लक्षणेही आपण बघितली आहे. यात दिल्या प्रमाणे तुम्हालाही काही लक्षणे असतील तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने यावर उपचार घ्या.

Health Disclaimer: आरोग्य विषयक या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून याबद्दल खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी मराठीजन (marathijan.com) हि आमची वेबसाईट किंवा यातील लेखक घेत नाही. लोक आरोग्याबाबत जागरूक असावे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी एवढाच या बातमी मागचा आमचा उद्देश आहे.

Health Disclaimer: The information given in this article/post regarding health is preliminary. This information is not a substitute for medical advice and should be checked by a doctor or medical specialist before using this information. Marathijan (marathijan.com) neither our website nor its author takes responsibility for this information. Our aim behind this news is to make people aware about health and inspire them for it.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त