Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना बंद झाली आहे का? पैसे कधी मिळणार? बघा सर्व माहिती

Has the Ladki Bahin Yojana been discontinued

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात पुढचे हप्ते महिलांना मिळू शकणार नाहीत. कारण, तात्पुरत्या स्वरुपात लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे. तसंच, या योजनेअंतर्गत नवे अर्ज स्वीकारणंही बंद करण्यात आलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार, राज्यात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्या आहेत. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबवला आहे. परिणामी निवडणुका होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांना मिळणार नाहीत. दरम्यान, राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्र पैसे दिले होते. त्यामुळे आता डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थगित

आर्थिक लाभ देऊन मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून सर्व प्रशासकीय विभागांना देण्यात आल्या. तसंच, आर्थिक लाभ देणाऱ्या योजनांचा आढावाही घेण्यात आला. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सर्व विभागांकडे याबाबतची विचारणा केली. त्यानुसार, महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आलं. त्यामुळे विभागाकडू या योजनेची माहिती मागवण्यात आली आहे. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला देण्यात आली. परिणामी निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही योजना तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.

अफवा आणि सरकारचे स्पष्टीकरण

केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी थांबविण्याचे निर्देश दिल्यानंतर तसंच या योजनेअंतर्गत नवे अर्ज स्वीकारणंही बंद करण्यात आल्यानंतर काही राजकीय नेत्यांकडून ही योजना बंद झाल्याची अफवा उठवण्यात आली होती. त्यानंतर सरकारकडून लगेचच त्यावर स्पष्टीकरण देण्यात आहे. याबद्दल महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी १९ ऑक्टोबर रोजी रात्री एक्सवर पोस्ट करून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार” असे स्पष्टपणे म्हटले आहे.

अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती”. असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

यानंतर राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही अदिती तटकरेंची पोस्ट शेअर करत या योजनेबद्दल मोठे विधान केले. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये, असे ते म्हणाले. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्यानं अतिशय जबाबदारीनं सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये”, अशी पोस्ट अजित पवार यांनी एक्सवर केली आहे.

डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा

महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. अडीच लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या २१ ते ६५ वयोगटातील महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दरमहा दीड हजार रुपये दिले जातात. जुलै महिन्यापासून ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने राबवली आहे. आतापर्यंत पाच हप्त्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमाही झाले आहेत. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पैसे दिल्यानंतर सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र खात्यात जमा केले. यानंतर आता महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी थेट डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची घोषणा केली आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top