Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनीला असं फसवलं गेलं – लाखो रुपयांचे कर्ज गश्मीरला फेडावं लागलं

Ravindra Mahajani: अभिनेते रवींद्र महाजनी हे अभिनेता असण्यासोबतच बांधकाम व्यवसायात सुद्धा हात आजमावत होते. याची आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण याच बांधकाम व्यवसायात त्यांना फसवले गेले आणि यामुळे त्यांच्यावर लाखो रुपयांचे कर्ज झाले. हे कर्ज पुढे त्यांचा मुलगा गश्मीर याने खूप मेहनत घेत फेडले. याविषयी सुद्धा आपण ऐकले आहे. पण हे सर्व नेमकं कसं घडलं होतं? याबद्दलची माहिती आता अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात पेज नंबर 86 ते 89 वर सांगितलं आहे. (Actor Gashmeer Mahajani paid the loan of lakhs of rupees of his father Ravindra Mahajani – Madhavi Mahajani in her Chautha Ank Book)

याबद्दल माधवी म्हणाल्या आहे की “रवीला एक फायनान्सर भेटला. त्या वेळी रवीने ‘सत्तेसाठी काहीही’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्यात सुबोध भावे पहिल्यांदा चित्रपटात आला. चित्रपटाचा फायनान्सर तळेगावचा होता. चित्रपट वितरित करण्यासाठी आणखी दहा लाखांची गरज होती. तेव्हा आमच्या घरावर रवीनं पुन्हा कर्ज काढलं. हा चित्रपट फारसा चालला नाही. निर्मात्याचेही पैसे बुडले आणि आम्हाला दहा लाखांचं कर्ज मात्र झालं.”

“काही दिवसांनी रवीनं पुण्यातील भुसारी भागात जमीन घेतली. रवीकडे काहीजणांनी स्वतःच्या पैशांचीही गुंतवणूक केली होती. माझ्या बहिणीने पंधरा लाख घातले. एकूण पन्नास लाख भांडवल त्यानं जमा केलं. त्यातून इमारती बांधून कोट्यवधी रुपये कमवायचे त्याचे स्वप्न होते. तो त्याची बहीण विद्याताई यांना म्हणालाही होता की, ‘या प्रोजेक्टमधे मी कोट्याधीश होणार आहे. यात मधूची काहीही आर्थिक मदत घेतलेली नाही.’ मात्र या साऱ्या प्रकरणात तो फसला गेला. खरं तर त्यानं वकिलांना विचारूनच सगळं केलं होतं. विकणाऱ्यानं असं केलं की, जी जमीन विकायची म्हणून रवीला दाखवली, ती वेगळीच होती. तो प्लॉट रिकामा होता. आणि जी विकण्यासाठी त्यानं पैसे घेतले, ती आधीच विकली गेली होती व त्यात माणसं रहात होती.”

“अखेरीस एका स्थानिक पुढाऱ्याची मदत घेऊन त्यातले चाळीस लाख आम्ही परत मिळवले. पण बँकेच्या कर्जातले दहा लाख रुपये फेडता आले नाहीत. त्याचे व्याजही न भरल्यामुळे फेडायची रक्कम वाढत गेली आणि ते कर्ज वीस लाखापर्यंत जाऊन पोचलं. त्या वेळी गश्मीरची दहावीची परीक्षा संपली होती. त्याच्या बरोबरीची मुलं सुट्टीत पालकांबरोबर कुठेकुठे मजा करायला गेली होती. गश्मीरला काही करमेना. मग मी त्याला म्हटलं, ‘अरे, तुला डान्स चांगला करायला येतो. तर तू या सुट्टीत त्याचे क्लासेस का नाही घेत? आपल्याकडे जागा भरपूर आहे.’ त्याला नृत्याची जन्मजात आवड होती व त्यात गतीही होती; हे माझ्या लक्षात आले होते.”

मग आम्ही महाराष्ट्र टाइम्समधे छोटी जाहिरात दिली. मे महिन्यात एक महिन्याचे नृत्यशिबीर असून पाचशे रुपये फी त्यामधे लिहिली. गश्मीर 18 पेक्षा कमी वयाचा असल्याने रात्री गाडी घेऊन मी त्याच्याबरोबर जात असे. त्याच्या क्लासची पोस्टर्स आम्ही लावली. ज्या दिवशी क्लास सुरू होणार होता, त्या दिवशी सकाळपासून आम्ही आता कोण येईल म्हणून उत्सुकतेने वाट पाहात होतो. सुरुवातीला माझ्या नणंदेचा नातू शौनक आणि त्याचा एक मित्र असे दोघे आले आणि सुरुवात तर झाली म्हणून आम्हाला आनंद वाटला. त्यानंतर हळूहळू संख्या वाढत गेली.”

“पहिल्या दिवशी वीस विद्यार्थ्यांनी फी भरून प्रवेश घेतला. पालक व विद्यार्थी या क्लासवर खूश झाले व त्यांनीच आग्रह केला की, तुम्ही नेहमीच असे क्लास घेत जा. आम्ही आमची मुलं पाठवू. अशा तऱ्हेनं आमच्या एका नवीन व्यवसायास नुकत्या दहावी झालेल्या लहान गुरूपासून सुरूवात झाली. त्यातही शिकायला येणाऱ्यांची संख्या वाढण्यासाठी आम्ही दोघांनीही कष्ट घेतले आणि क्लास चांगला चालू लागला. असे जरी असले तरी मिळणाऱ्या पैशातून आमचा महिन्याचा घरखर्च, मुलांची फी, घराचा टॅक्स यात सारे पैसे संपून जायचे.”

“इतकं झाल्यावर एक दिवस रवीनं आम्हाला येऊन सांगितलं की, वीस लाख रुपये बँकेचे फेडलेले नसल्यामुळे आता बँकेची जप्ती येणार आहे. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. खालचा मजला बंद करून ते तिथे नोटीस लावणार आहेत; हे कळले तेव्हा गश्मीर सतरा-अठरा वर्षाचा होता. तिथे घरावर जप्ती येतेय म्हटल्यावर आम्ही एक मजला घराच्या ड्रॉईंगरुममध्ये क्लास सुरु केला. वरती क्लास घेऊ लागलो. त्या वेळी मी आमच्या तीन मजली इमारतीत एका मजल्यावर पेइंग गेस्ट ठेवण्यास सुरुवात केली.”

“जप्ती येण्याबाबत कळल्यावर गश्मीरला घेऊन मी बँकेत गेले. तेथील अधिकाऱ्यांना भेटले. त्यांनी चांगले सहकार्य दिले. त्यांनी सांगितले की, निदान व्याज तरी भरा म्हणजे जप्ती थांबवता येईल. पण त्यासाठीही पैसे नव्हते. मग मी घरातले सगळे दागिने बँकेकडे गहाण ठेवले. त्यामुळे जप्ती थांबली. त्या वेळी गश्मीरनी मला पुष्कळ धीर दिला. मला सावरलं. जेमतेम अठरा वय असलेला गश्मीर अचानक अंगावर मोठी जबाबदारी आल्यामुळे प्रौढ झाला होता. आता जी काही जबाबदारी घ्यायची आहे, ती आपणच घ्यायची आहे, हे जणू त्यानं मनातनं स्वीकारलं होतं. मग त्यानंतर त्यानं इव्हेन्ट्स घ्यायला सुरुवात केली. ते उत्तम होत होते. त्यातून मिळणाऱ्या पैशातून आम्ही पूर्णपणे कर्जमुक्त झालो.” अशी माहिती माधवी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात दिली आहे.

chautha anka book
1Our Pick
‘चौथा अंक’

माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त