Animal Movie Review: धोका झाला – हाईप खोटी ठरली

Animal Movie Review: अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kappor) खूपच चर्चेत असलेला चित्रपट ‘अ‍ॅनिमल’ हा एक डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहित असणे आवश्यक आहे की हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी दिग्दर्शित केलाय, याआधी त्यांनी ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ हे दोन सुपरहिट चित्रपट बनवले होते आणि जर तुम्ही त्यापैकी एकही पाहिला असेल तर दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांनी आतापर्यंत कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवले आहेत याची तुम्हाला कल्पना असेल आणि त्यावरूनच आता तुम्ही देखील अंदाज लावू शकता की अ‍ॅनिमल हा चित्रपट कसा असेल.

संदीप रेड्डी वांगा यांनी जे म्हटले ते करून दाखवले

दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचा मागील चित्रपट ‘कबीर सिंग’ बद्दल खूप वाद झाला होता, लोकांनी या चित्रपटाला खूप हिंसक म्हटले होते. तेव्हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा म्हणाले होते की, “जर लोकांना कबीर सिंग हिंसक वाटला असेल तर मी त्यांना पुढच्या चित्रपटात दाखवेन की हिंसा काय असते.” हे संदीप रेड्डी वांगा यांचे शब्द होते, आणि आता त्यांनी ते खरं करून दाखवलंय. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी ‘अॅनिमल’ या चित्रपटात हिंसाचाराची पातळी खूप वरच्या पातळीवर नेवून ठेवली आहे.

नैतिकता शोधू हि नका

जर तुम्ही ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटातील कोणत्याही पात्राची मूल्ये आणि नैतिकता शोधण्याचा प्रयत्न करत असाल तर ते करू नका. हा चित्रपट कोणते पात्र योग्य आणि कोणते चुकीचे यावर नाहीच. या चित्रपटाच्या नावावरूनच तुम्हाला कळेल की हा चित्रपट माणसाच्या आतला हिंसक प्राणी दाखवतो. प्रत्येक माणसाच्या आत एक हिंसक प्राणी असतो अशी एक म्हण आहे, तसाच हा चित्रपट तुमच्या आतल्या प्राण्याला जागं करण्याचा प्रयत्न करतो. पडद्यावर सुरू असलेला रक्तपात अनेकांना आवडेल. आणि ते बघून अनेकजण थिएटरमध्ये टाळ्या शिट्ट्या सुद्धा वाजवतील, परंतु त्या पात्रासाठी तुमच्या हृदयात भावना जोडल्या जाणार नाही असा हा हिंसक चित्रपट आहे.

अपेक्षेप्रमाणे अॅक्शन नाही

म्हणजे हा चित्रपट बघतांना तुम्हालाही वाटेल की, हो.. आता या पात्रासोबत चुकीचं घडलंय, तर तो बदला घेण्यासाठी आत्ता भयंकर युद्ध करेल, फाईटिंग सिन्स दिसतील, जबदस्त अॅक्शन बघायला मिळेल… वगैरे वगैरे.. पण असं काही या चित्रपटात घडत नाहीये. त्यामुळे हा चित्रपट बघतांना जास्त विचार करू नका, कारण या चित्रपटात फारशी अॅक्शन नाही. काही ठिकाणी अॅक्शन आहे आणि बाकी ड्रामा अधिक आहे. पण यामुळे तुमची चित्रपटातील आवड कमी होत नाही. खरंतर या चित्रपटाच्या कहाणीचा आनंद घ्या, कारण रणबीरचा अभिनय, संवाद आणि चांगली कथा हे सर्व बघायला छान आहे. पण काही त्रुटीही दिसत आहेत ज्या सुधारता आल्या असत्या. आज आपण याबद्दल देखील बोलूया.

फक्त रणबीर रणबीर

अॅनिमल चित्रपटाची संपूर्ण कथा मुळात रणबीर कपूरच्या ‘विजय’ या व्यक्तिरेखेवर आधारित आहे. रणबीर कपूरचे पात्र ज्याचे नाव खरंतर अॅनिमलच आहे असंच तुम्ही समजू शकता, कारण यात त्याचे वडील म्हणजेच अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor) चे पात्र बलबीर सिंग यांच्यावरचे इतके प्रेम आहे की तो त्यांच्यावरच्या या प्रेमापोटी कोणत्याही थराला जाऊ शकतो. त्यांना जर काही तर संपूर्ण जग जाळून टाकण्याची भाषा तो करत असतो.

एका सीन मध्ये गोल्फ खेळताना त्याच्या वडिलांना कोणीतरी गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा आपल्याला असं वाटतं आता रणबीर येईल, भयंकर युद्ध होईल, तुफान राडे घालेल, एकेका शत्रूला शोधून काढेल आणि बदला घेईल, असं आपल्याला वाटतं, पण चित्रपटात तसं काही घडत नाही. कारण या घटनेनंतर चित्रपटात अनिल कपूरचा मुलगा रणबीर कपूरची ही व्यक्तिरेखा कुठे आहे, त्याच्या घरात कोण कोण आहे, वडिलांचे आणि त्याचे संबंध कसे आहेत आणि घडलेल्या प्रकाराला उत्तर देण्यासाठी तो कितपत हिंसाचार करू शकतो किंवा कोणत्या थराला जाऊ शकतो हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. त्यासोबतच त्याच्या वडिलांवरच्या या प्रेमाच्या प्रमाणात त्याची पत्नी रश्मिका मंदान्नाची ही व्यक्तिरेखा कोठे आहे, त्याची मुले कुठे आहेत. हे सर्व आपल्यासमोर आणलं जातं.

चित्रपटात रणबीर कपूरच्या या व्यक्तिरेखेच्या या सर्व छटा दाखवल्यानंतर मग जणू चित्रपटच त्याला प्रश्न विचारतो की आता संग तू तुझ्या बापाचा बदला घ्यायला काय करू शकतो? मग याचे उत्तरही अगदी सोप्पं आहे ते म्हणजे हिंसा. हीच या चित्रपटाची मूळ कथा आहे, जी अति हिंसा, तर्कहीन प्रेम, सनकी मानसिकता आणि प्रचंड स्री विरोधातून दाखवली आहे. याचाच अर्थ, या चित्रपटातील सर्वच पुरुष पात्रांच्या आयुष्यात ते स्त्रीला फार काही महत्वाचे स्थान देत नाही. सर्व पात्रे त्यांचा राग त्यांच्या पत्नींवरच काढतांना दिसतात आणि त्यांना तेवढं महत्वही नाही. म्हणजेच हा संपूर्णपणे पुरुष मानसिकतेतून बनलेला चित्रपट आहे.

अति हाईप खोटी ठरली

या चित्रपटाच्या रिलीज अगोदरपासून पसरवण्यात आलेल्या अ‍ॅक्शन हाईपवर जास्त जाऊ नका, नाहीतर तुमची घोर निराशा होईल. अगोदर या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला एक दमदार अॅक्शन चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले असेल, पण तसं नाहीये. यात अ‍ॅक्शन खूपच कमी आणि ड्रामा खूप ज्यादा आहे. या चित्रपटाबाबत एका मुलाखतीत असंही म्हटलं होतं की “या चित्रपटात तुम्हाला जेमतेम फक्त अर्धा तास अॅक्शन पाहायला मिळेल आणि उरलेले दोन तास चाळीस मिनिटे ही कथा असेल.” या चित्रपटाचा एकूण कालावधी तीन तास वीस मिनिटांचा आहे.

यात पहिला मोठा अॅक्शन सीक्वेन्स मध्यांतराच्या अगदी आधी आणि दुसरा अॅक्शन चित्रपट संपण्यापूर्वी दिसेल. मला हा चित्रपट त्याच्या दुसऱ्या हाफपेक्षा पहिल्या हाफपर्यंत चांगला वाटला. या चित्रपटाचे संवाद चांगले आहेत. ड्रामा चालू असतांना अनेक चढ उतरांत हा चित्रपट अनेक वेळा भूतकाळात जात राहतो आणि मग पुढे काही छोटासे अॅक्शन सीक्वेन्स येतात. पण अॅक्शन हा या चित्रपटाचा मजबूत घटक नाही.

लॉर्ड बॉबीसोबत धोका झाला

चित्रपटात अॅक्शन कमी असली तरी आपल्याला अगोदरपासून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण होत नाहीत. कारण ट्रेलरमध्ये बॉबी देओलची व्यक्तिरेखा ज्या पद्धतीने छोट्या भूमिकेत दाखवण्यात आली आहे, तीच गोष्ट चित्रपटातही आहे. याचा अर्थ असा की बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल आधीच जी हाईप तयार करण्यात आली होती ती खरी नाही. या चित्रपटात तुम्ही बॉबी देओलला फक्त कॅमिओ रोल म्हणू शकता. एक प्रकारे तुम्ही असेही म्हणू शकता की लॉर्ड बॉबीच्या व्यक्तिरेखेसोबत खूप मोठा धोका झाला आहे. ट्रेलर बघितल्यानंतर सर्वांना असं वाटलं होतं की या चित्रपटात बॉबी देओल हा एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेत असेल, किंवा प्रेक्षकांना रणबीर विरुद्ध बॉबी अशी टफ फाईट बघायला मिळेल. पण चित्रपटात तसं काही दिसलं नाही.

टीझर आणि ट्रेलरमध्येही बॉबी देओलची भूमिका आपल्याला फारशी दाखवण्यात आली नव्हती. त्याप्रमाणेच चित्रपटातही बॉबीचे जेमतेम तीन-चार सीन दाखवण्यात आलेय. पण मला वाटतं की बॉबी देओलचं पात्र जास्त दाखवायला हवं होतं. हाईपमुळे ही एक मोठी संधी असू शकली असती, आणि यामुळे दुसऱ्या हाफ मध्ये चित्रपट बघायला अजून जास्त मज्जा आली असती.

किसिंग सीन आणि सेक्सवर चर्चा

या चित्रपटात खूप हिंसाचार आणि रक्तपात तर आहेतच, पण त्या सोबतच अनेक किसिंग सीन आहेत, आणि अनेक सीन मध्ये तर सेक्सबद्दल चर्चा होत आहेत आणि त्यातील एका पात्राचा पूर्ण न्यूड सीन सुद्धा आहे. त्यामुळे एकाच चित्रपटात बरंच काही दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी केला आहे. तो कदाचित काहींना आवडेल किंवा काहींना आवडणार नाही.

पुन्हा पाहण्याची इच्छा नाही

कमी अ‍ॅक्शन असूनही हा चित्रपट तुम्हाला फारसा निराश करणार नाही कारण नैतिकतेचा विचार केला नाही तर स्टोरी चांगली आहे, रणबीर कपूरचा अभिनय अप्रतिम आहे, पण बॉबी देओलचा अधिक चांगला वापर करता आला असता असं सतत वाटतं. आणि अ‍ॅक्शन अपेक्षेप्रमाणे दाखवली नाही, या काही नक्कीच या चित्रपटाची कमतरता आहे.

संगीताबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटातील ट्रॅक पडद्यावर अगदी उजवा आहे. विशेषतः जर आपण पार्श्वसंगीताबद्दल बोललो तर ते माणसातला हिंसक प्राणी बाहेर आणण्यात हे संगीत मोठी भूमिका बजावते. आणि ते ऐकायला खूप छान वाटतं.

एकूणच हा एक मनोरंजक चित्रपट आहे. पण एकदा हा चित्रपट बघितल्यानंतर पुन्हा पाहण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे अॅनिमल चित्रपट रिलीज होण्याअगोदर या चित्रपटाची जेवढी हाईप करण्यात आली होती, त्या कसोटीवर हा चित्रपट खरा उतरत नाही, हे सुद्धा एक सत्य आहे.

Share this Post:

संतोष चकोर हे एक लेखक आहेत. 2015 पासून ते डिजिटल मार्केटिंग, यूट्यूब आणि ब्लॉगिंग या क्षेत्रातही काम करत आहेत. विशेषतः ते तंत्रज्ञान, आरोग्य आणि इतर क्षेत्रातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. सध्या ते मराठीजन या आमच्या वेबसाइटवर संपादक आणि लेखक म्हणून काम करत आहेत आणि दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील अपडेट्स लिहितात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त