Laxmikant Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेला अखेरपर्यंत ती खंत वाटत राहिली – वर्षा उसगावकर यांचा खुलासा

Varsha Usgaonkar about Actor Laxmikant Berde

Laxmikant Berde: एके काळी मराठी चित्रपट सृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले होते. पण त्या काळात त्यांना विनोदी भूमिकाच जास्त मिळत. त्यामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना आपली ही ओळख बदलायची होती. असा खुलासा अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नुकताच केला आहे.

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हमाल दे धमाल, कुठे कुठे शोधू मी तुला, नवरा मुंबईचा, अफलातून, एक होता विदूषक अशा काही चित्रपटांत एकत्र काम केले होते. त्या काळात त्यांची जोडी सुद्धा खूप सुपरहिट झाली होती. या दरम्यानचाच एक किस्सा सांगत लक्षाला त्या गोष्टीचं खूप वाईट वाटलं त्याला अखेरपर्यंत ती खंत वाटत राहिली असं अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सांगितले आहे.

अभिनेत्री वर्षा उसगावकर त्याबद्दल म्हणाल्या की “आज लक्ष्या असता तर तो एका वेगळ्या पद्धतीने चमकला असता, त्याचं अकाली निधन झालं. मी त्याच्यासोबत एक होता विदूषक हा चित्रपट केला. त्या काळात लक्ष्या हा सारखा सारखा कॉमेडी अभिनयासाठी ओळखला जायचा. त्याला एक खंत होती आपल्या अभिनयाचे विविध पैलू प्रेक्षकांसमोर यावेत. जब्बार पटेल यांनी त्याला ही संधी देऊ केली तेव्हा त्याने मला फोन केला. आणि या चित्रपटात माझ्यासोबत तू काम करावंस अशी इच्छा त्याने व्यक्त केली. भले तुला मानधन कमी मिळाले तरी त्यात तू मला हवी आहेस. त्याचं म्हणणं मी ऐकलं आणि चित्रपट केला.”

“लक्ष्याने त्या चित्रपटात ज्या पद्धतीने काम केलं ते खूप टचिंग होतं. या चित्रपटात त्याचे सिन नसले तरी तो इतरांच्या सिनवेळी उपस्थित असायचा. मला त्यात एक वेगळा लक्षा पाहायला मिळाला. त्या चित्रपटातील त्याचा अभिनय अवॉर्ड विनिंग होता त्या भूमिकेसाठी त्याला पुरस्कार मिळायला हवा होता असं मला वाटलं होतं. पण त्यावर्षीचा अवॉर्ड त्याला मिळाला नाही. त्याला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं. त्या चित्रपटासाठी आपल्याला पुरस्कार मिळायला हवा होता ही खंत त्याच्या मनात अखेरपर्यंत राहिली होती. त्याला जर तो पुरस्कार मिळाला असता तर त्याच्या अभिनयाला एक वेगळा पैलू पडला असता. विनोदी अभिनयाच्या चौकटीतून त्याला बाहेर पडता आले असते.” असं अभिनेत्री वर्षा उसगावकर म्हणाल्या आहे.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top