Laxmikant Berde: लक्ष्मीकांत बेर्डेने स्वत:ला संपवलं, बायकोचंही ऐकलं नाही – भावाचा खुलासा

Laxmikant Berde: मराठी चित्रपट क्षेत्रात एक काळ गाजवणारे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आजही असंख्य लोक आवडीने बघतात. आजही त्यांचे अनेक चित्रपट आपलं मनोरंजन करत असतात. ‘धूमधडाका, दे दणादण, चल लक्ष्या मुंबईला, अशी ही बनवाबनवी, झपाटलेला, धडाकेबाज, हमाल दे धमाल, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एक होता विदूषक, पछाडलेला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं होतं. मराठीसह हिंदी चित्रपट क्षेत्रात सुद्धा या दिग्गज अभिनेत्याने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. खासकरून त्यांना एक विनोदी अभिनेता म्हणून ओळखलं जायचं. (Laxmikant Berde brother Purshottam Berde about actor Laxmikant Berde’s professional life)

मात्र खूप कमी वयात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले. 16 डिसेंबर 2004 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं अचानक जाणं हा कलाविश्वासह त्यांच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी मोठा धक्का होता. आजही अनेक कार्यक्रमात लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मित्र अभिनेते सचिन पिळगांवकर, अशोक सराफ हे त्यांची आवर्जून आठवण काढतात, त्यांचे अनेक किस्से सांगतात.

नुकतंच ‘सिनेमागल्ली’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू निर्माते पुरुषोत्तम बेर्डे यांनी त्यांचा भाऊ लक्ष्मीकांत काही आठवणी सांगत अनेक खुलासे केले आहेत. या मुलाखतीत “लक्ष्मीकांत यांच्याबद्दल कोणत्या गोष्टीची खंत वाटते ?” असा प्रश्न त्यांना विचारला असता पुरुषोत्तम बेर्डे म्हणाले की “लक्ष्मीकांतच आज नसणं हा माझ्यासाठी खूप मोठा लॉस आहे. आम्हा दोघांमध्ये दिलखुलास गप्पा कधीही झाल्या नाहीत. आम्ही एकमेकांशी नेहमी शांतपणे बोलायचो. काहीही न बोलता मनातल्या भावना आम्हाला कळून जायच्या. त्याचा माझ्यावर प्रचंड विश्वास होता, तसा माझा सुद्धा त्याच्यावर खूप विश्वास होता. मला असं वाटतं हळुहळू त्याने स्वत:ला संपवलं. ही माझी सर्वात मोठी खंत आहे. कारण, लहानपणापासून त्याने कधीही कोणाचंही ऐकलं नाही. सुपरस्टार पद मिळालं त्यानंतर त्याला अध्यात्माची गरज होती. पण, मी लक्ष्मीकांतला ‘तू या या गोष्टींपासून लांब राहा’ असं कधीच सांगू शकलो नाही.”

“आयुष्यात जो अहंकारावर मात करतो, तोच या कलाक्षेत्रात टिकून राहतो. याचं उदाहरण द्यायचं झालं, तर जितेंद्र कुमार, अशोक सराफ…अशी बरीच मंडळी आहेत. लक्ष्मीकांतने त्याच्या बायकोचं तरी ऐकलं पाहिजे होतं. आज अशोक सराफ यांची संपूर्ण जीवनशैली निवेदिता सांभाळते. आज ते वयाच्या 75 व्या वर्षी महाराष्ट्र भूषण झाले. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. कलाकारासाठी त्याचं शरीर हे खूप महत्त्वाचं माध्यम असतं. तुमचं शरीरचं तुम्ही घालवलं, तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार? आणि फोटोला कधीच महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री मिळणार नाही. हे शरीर आहे म्हणून तुम्ही लोकांसमोर जाता. शरीर ज्यादिवशी नष्ट होईल तेव्हा तुम्ही अभिनेते म्हणून संपाल अन् एकंदर सगळंच संपतं. त्यामुळे शरीर या माध्यमाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. यासाठी आयुष्यात गुरु पाहिजे. अध्यात्मिक गुरु नेहमीच तुम्हाला चांगला मार्ग दाखवतील.”

“आपल्याला गुरु कोणत्याही स्वरुपात लाभू शकतो. तुमची गुरु तुमची पत्नी देखील असू शकते. मी माझ्या पत्नीचं सगळं ऐकतो. पण, लक्ष्मीकांत हा संपूर्णपणे स्वत: निर्णय घ्यायचा. त्याला जरी कोणी सेक्रेटरी असला तरी, अंतिम गोष्टी तो सांगेल त्याच व्हायच्या. त्यामुळे त्याने कोणाचं ऐकलं असतं तर फार बरं झालं असतं. वैयक्तिक आयुष्यात त्याने नेमकं कोणाला आत्मसमर्पण केलं होतं, हे मला शेवटपर्यंत समजलं नाही. त्याने कोणाचंही ऐकलं नाही आणि आपण सगळ्यात मोठ्या गोष्टीला मुकलो.”

“आज तो असता तर, अनेक गोष्टी वेगळ्या असत्या. अगदी शेवटी मला तो येऊन भेटला आणि त्याने मला सांगितलं मला एक गंभीर विषयावर आधारलेलं नाटक करायचंय. माझ्याकडून त्याने ‘सर आली धावून’ हे नाटक लिहून घेतलं आणि त्याच्या शेवटच्या काळात या नाटकात त्याने काम केलं. पण, आजच्या घडीला तो नसणं हा सगळ्यात मोठा लॉस आहे आणि याचं कारणही तो स्वत:च आहे. त्याने कोणाच्याही अंडर काम केलं नाही, कोणाचं ऐकलं नाही आणि आज आपल्याला मोठा फटका बसला.” असं पुरुषोत्तम बेर्डे यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

Share this Post:

सुजाता कराड या ब्लॉगर आणि कंटेंट रायटर आहेत. त्यांना मनोरंजन क्षेत्रात जास्त रस आहे. त्यामुळे या क्षेत्रातील चित्रपट, मालिका, कलाकार आणि इतर अपडेट्सची माहिती न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. सध्या ती मराठीजन या आमच्या वेबसाइटवर लेखिका म्हणून काम करत आहे आणि येथे मनोरंजनाच्या बातम्या आणि अपडेट्स लिहिते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment

Shivani Surve Wedding: अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांचा विवाहसोहळा Swanandi Tikekar Wedding: अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्नात घेतला हा खास उखाणा Sur nava dhyas nava Top 6: यापैकी विजेता म्हणून तुमची पसंती कोणाला? Actor Druv Datar Wedding: ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिकेतील अभिनेता ध्रुवचे झाले लग्न Ravindra Berde: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन – लक्ष्मिकांत बेर्डे यांचे बंधू या आजाराने होते त्रस्त