Shubham Borade: काही दिवसांपूर्वी ढोलकीच्या तालावर हा कर्लस मराठीवरील शो खूप गाजला. या शोमध्ये काही लावण्यवतींनी सहभाग घेतलेला आणि आपल्या लावणी डान्स आणि नृत्यअदा सादर केल्या. पण सर्वाधिक चर्चा झाली ते शुभम बोराडे याची. मुलगा असूनही त्याने अप्रतिम लावणी डान्स सादर केले. शुभम बोराडे हा या शोचा उपविजेता ठरला पण प्रेक्षकांच्या मते तोच या शो चा विजेता असायला हवा होता. फक्त मुलगी नसल्याने त्याला उपविजेता केलं असा आरोपही प्रेक्षकांनी केला होता.
ढोलकीच्या तालावर या शो मुळे शुभमची कला जगासमोर आली. लावणी डान्स साठी मुलींना नाही तर एका मुलाला प्रेक्षकांची एवढी पसंती मिळणं हे पहिल्यांदाच घडतंय. शुभम बोराडे ने त्याच्या लावणी डान्स ने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. आज सर्वजण त्याचे कौतुक करत आहे पण काही दिवसांपूर्वी मात्र एक मुलगा मुलींसारखे लावणी डान्स करतोय हे समाजाला मान्य होत नव्हतं.
नागपूरात वाढलेल्या शुभमला मुलगा असूनही सुरुवातीपासूनच लावणी डान्सची खूप आवड होती. पण आसपासच्या लोकांना त्याचे मुलींसारखे लावणी डान्स करणे मान्य नसल्याने त्याला खूप कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागले. नुकतंच अल्ट्रा मराठी बझला दिलेल्या एका मुलाखतीत शुभमने याविषयी एक किस्सा शेअर केला आहे. यात त्याने लोकांच्या त्रासाला कंटाळून एकदा स्वतःला फाशी लावून घेतली होती असंही सांगितलंय.
या मुलाखतीत लोकांनी दिलेल्या त्रासाबद्दल शुभम म्हणाला की “बरीच वर्षे झालीत या गोष्टीला. तेव्हा मी नवीन नवीन लावणीला सुरुवात केली होती. त्यावेळी मुलांनी लावणी करणं हे लोकांना पचत नव्हतं. मुलगा लावणी करताना दिसला, साडी नेसून नाचताना दिसला की लोक तोंडावर हसायचे. आपली आवड म्हणून अनेक जण डान्स करतात. जेव्हा एखादी मुलगी डान्स करते, पण तिला नाचता येत नसेल तरी तिच्यासाठी टाळ्याच वाजतात. पण एखादा मुलगा जेव्हा डान्स करायला शिकतो किंवा लावणी करतो तेव्हा त्याच्या कपड्यांवरून आणि पूर्ण लूकवरुन थोडा विचित्र दिसतो, त्यामुळे लोक त्याला जोकरसारखे वागवतात. माझ्याबरोबर असं खूपदा व्हायचं.”
लोकांच्या त्रासाला कंटाळून शुभमने स्वतःला फाशी लावून घेतली होती त्या प्रसंगाबद्दल शुभम म्हणाला की “माझी आई तेव्हा कुठे गेली की लोक कमेंट्स करायचे, माझ्याबद्दल वाईट बोलायचे. हे सगळं ऐकून माझी आई कधी कधी खूप दुःखी व्हायची, ती रडायची. तिला मी माझ्यासाठी रडताना पाहिलं आहे. त्यावेळी माझं मन खूप तुटलं होतं, लोकांमुळे माझ्या आईला त्रास होतोय हा विचार सतत यायचा. माझं वय खूप कमी होतं तेव्हा मी स्वतःला फाशी लावून घेतली होती. त्यावेळी मी सहावीला असेन. मी लटकलो आणि माझा एक मित्र घरी आला. ‘शुभम आहेस का घरी?’ अशी हाक त्याने मारली. कारण आम्ही कुठेतरी बाहेर जाणार होतो. मला पाहिल्यावर खूप रडारडी झाली होती. मी पेरूच्या झाडाला लटकलो होतो, तो तिथे आला आणि त्याने मला वर उचलून धरलं. अशा रितीने मी त्यावेळी वाचलो होतो.”
लोकांचं बोलणं जिव्हारी लागण्याबद्दल शुभम म्हणाला की “खरं तर लोकांमुळे माझ्या मनात हे विचार आले होते आणि मी ते केलं. विचार करा की लोकांचं बोलणं एखाद्याला किती जिव्हारी लागू शकतं, त्यामुळे लोकांनी बोलण्याआधी विचार करायला हवा की आपल्यासाठी हे बोलणं खूप सोपं आहे, पण ते ऐकणं समोरच्यासाठी खूप कठीण असू शकतं. लोकांच्या बोलण्याने एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा त्याचं काहीही होऊ शकतं.” असं शुभम बोराडे ने म्हटलं आहे.
सुरुवातीच्या काळात शुभमने खूप त्रास सहन केला पण ढोलकीच्या तालावर या शोचा उपविजेता ठरल्याने तो आता एक सेलिब्रिटी बनला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात लावणी डान्ससाठी शुभमला ओळखलं जातं आणि त्याला आता लोकांची पसंती सुद्धा मिळतेय.