Coaching Centers New Guideline 2024: केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने देशातील कोचिंग पद्धतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता कोचिंग सेंटर 16 वर्षांखालील मुलांना दाखल करून घेऊ शकणार नाहीत. एवढेच नाही तर शिक्षण मंत्रालयाने कोचिंग सेंटर्सवर दिशाभूल करणारी आश्वासने आणि चांगल्या गुणांची हमी देण्यावरही बंदी घातली आहे.
16 वर्षांखालील मुलांना कोचिंगमध्ये दाखल करण्यास बंदी
केंद्र सरकारने कोचिंग संस्थांसाठी तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत (GUIDELINES FOR REGULATION OF COACHING CENTER). याद्वारे केंद्र सरकारने खासगी कोचिंग सेंटर्सवर लगाम घातला आहे. आता नोंदणी न करता कोणीही कुठेही आणि केव्हाही खाजगी कोचिंग सेंटर उघडू शकणार नाही. त्यासाठी त्याला नोंदणी करावी लागेल. 16 वर्षांखालील मुलांना कोचिंग सेंटरमध्ये दाखल केले जाणार नाही. म्हणजेच कोचिंग सेंटरमध्ये फक्त 16 वर्षा पेक्षा जास्त वय असणारे विध्यार्थीच शिक्षण घेऊ शकतील. कोचिंग सेंटर्स कोणत्याही विद्यार्थ्याकडून मनमानी शुल्क आकारू शकणार नाहीत. विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात घालून रस्त्यांवर आणि कोपऱ्यांवर कुठेही बिनदिक्कतपणे कोचिंग सेंटर्स उघडणे आता शक्य होणार नाही. आग, भूकंप यासारख्या आपत्ती टाळण्यासाठी कोचिंग सेंटर्स मध्ये संपूर्ण व्यवस्था करावी लागणार आहे. (Coaching of children below 16 years is closed)
विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे निर्णय
देशभरात आयआयटी जेईई (IIT JEE Coaching) आणि मेडिकल (NEET Medical Coaching) कोचिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या वाढत्या घटना, कोचिंग सेंटर्समधील आगीच्या घटना, बेलगाम कोचिंग सेंटर्सची मनमानी आणि कोचिंग सेंटर मध्ये असणारी अव्यवस्था अशा चिंता व्यक्त करणाऱ्या अनेक तक्रारी सरकारला मिळाल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
The Ministry of Education issues Guidelines for Regulation of Coaching Centers 2024, placing student well-being at the forefront. Grounded in #NEP2020 principles, these guidelines prioritize mental well-being, fair practices, and inclusivity. It's a step towards creating a…
— Ministry of Education (@EduMinOfIndia) January 18, 2024
कोचिंग सेंटर्सवर जबाबदारी
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, IIT JEE, MBBS, NEET सारख्या प्रोफेशनल कोर्ससाठी कोचिंग सेंटर्सना फायर आणि इमारत सुरक्षेशी संबंधित NOC असणे आवश्यक आहे. परीक्षा संबंधित दबाव आणि इतर समस्यांवर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित मदत देखील प्रदान केले जावे. ही जबाबदारी कोचिंग सेंटर्सवर असेल.
मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की विद्यार्थ्यांमधील कठीण स्पर्धा आणि शैक्षणिक दबाव लक्षात घेता कोचिंग सेंटर्सनी मुलांच्या कल्याणासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. कोचिंग संस्थांना विद्यार्थ्यांना तणाव आणि नैराश्यापासून वाचवावे लागेल आणि मानसिक आरोग्याशी संबंधित मदतीसाठी अनुभवी मानसशास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागेल.
5 तासांपेक्षा जास्त क्लास घेण्यास बंदी
कोणत्याही परिस्थितीत शाळा किंवा संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत कोचिंग क्लासेस घेण्यात येणार नाहीत. दिवसात 5 तासांपेक्षा जास्त क्लास चालणार नाहीत. सकाळी लवकर आणि रात्री उशिरा वर्ग होणार नाहीत. विद्यार्थी आणि शिक्षकांना आठवड्याच्या शेवटी सुट्टी मिळेल. सणासुदीच्या काळात कोचिंग सेंटर विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाशी जोडण्याची आणि भावनिक मेळ वाढवण्याची संधी देतील. म्हणजेच सणासुदीला सुट्टी द्यावी.
फी परत करावी लागेल
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोर्सच्या कालावधीत फी वाढवता येणार नाही. जर एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण पैसे भरूनही कोर्स अर्धवट सोडण्यासाठी अर्ज केला, तर कोर्सच्या उर्वरित कालावधीचे पैसे परत करावे लागतील. यात वसतिगृह आणि मेस फी सुद्धा परत करावी लागेल.
तसेच काही मार्गदर्शक तत्त्वे खाली थोडक्यात दिले आहे.
- कोचिंग सेंटरची नोंदणी केल्यानंतरच एखादी व्यक्ती कोचिंग देईल.
- कोचिंग सेंटर्सची नोंदणी सुलभ करण्यासाठी सरकार एक वेब पोर्टल तयार करेल.
- तीन महिन्यांच्या कालावधीत नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- नोंदणीकृत कोचिंग सेंटरने नोंदणीची मुदत संपण्याच्या तारखेच्या दोन महिने आधी नोंदणी प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
- कोचिंगचा दर्जा, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या निकालाशी संबंधित कोणत्याही दाव्यांबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जाणार नाहीत.
- कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरलेल्या कोणत्याही शिक्षक किंवा व्यक्तीच्या सेवांचा लाभ कोचिंग सेंटर घेणार नाही.
- 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच माध्यमिक शाळेच्या परीक्षेनंतरच विद्यार्थ्याची नोंदणी करावी.
- कोचिंग सेंटर्स पालकांना/विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी भ्रामक दावे किंवा चांगल्या गुण मिळतील अशी दिशाभूल करणारी आश्वासने देणार नाहीत.
- ज्याची पात्रता पदवीपेक्षा कमी आहे अशा शिक्षकाला कोणतेही कोचिंग सेंटर नियुक्त करणार नाही.
- प्रत्येक कोर्स ची ट्यूशन फी फिक्स असेल. कोर्स दरम्यान फी वाढवली जाणार नाही, त्याची पावती द्यावी लागेल.
- नियोजित वेळेपूर्वी विध्यार्थ्याने कोर्स सोडल्यास, उर्वरित फी 10 दिवसांच्या आत परत करावी लागेल.
- विद्यार्थी वसतिगृहात राहत असतील तर वसतिगृहाची फी आणि मेसची फी सुद्धा परत करावी लागेल.
- कोचिंग सेंटरच्या वेबसाइटवर प्राध्यापकांची पात्रता आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा कालावधी नमूद करावा लागेल.
- वसतिगृहातील सुविधा, फी आणि मेसची संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
- मुलांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच त्यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा कोणताही दबाव टाकला जाणार नाही.
- विध्यार्थी जर काही दबावाखाली असेल तर त्यांच्या मदतीसाठी एक सिस्टम निर्माण करावी लागेल.
- कोचिंग सेंटरमध्ये साइकोलॉजिकल काउंसलिंग साठी योग्य माध्यम असावे. यात साइकोलॉजिस्ट आणि काउंसलरचे नाव आणि त्यांचा वर्किंग टाइम पालकांना कळवावा लागेल.
- मानसिक आरोग्याबाबत वेळोवेळी कार्यशाळा आयोजित केल्या पाहिजेत.
- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षक मानसिक आरोग्य विषयांवर प्रशिक्षण देखील घेऊ शकतात.
- ज्या कोचिंग सेंटरच्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यांना प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्रपणे नोंदणी करावी लागेल. याचाच अर्थ, प्रत्येक शाखा ही स्वतंत्र कोचिंग सेंटरसारखे मानले जाईल.
- कोचिंग सेंटरने टेस्ट पूर्वी विद्यार्थ्यांना त्या परीक्षेच्या काठीण्य पातळीबद्दल माहिती द्यावी.
- कोचिंग सेंटरने विद्यार्थ्यांना करिअरच्या इतर पर्यायांबद्दलही माहिती द्यावी.
- अपंग विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्यासाठी कोचिंगने त्यांना त्यांच्या गरजेनुसार सुविधा पुरवल्या पाहिजेत.
- कोचिंग सेंटर्स नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांकडून कोणतीही वेगळी फी न आकारता नोट्स आणि इतर साहित्य पुरवतील.
- साप्ताहिक सुट्टीनंतरच्या दिवशी कोणतीही मूल्यमापन चाचणी किंवा इतर कोणतीही परीक्षा होणार नाही.
- प्रत्येक वर्ग किंवा बॅचमध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या विवरणपत्रात स्पष्टपणे नोंदवली जावी आणि वेबसाइटवर प्रकाशित केली जावी.
- कोचिंग सेंटरने घेतलेल्या मूल्यांकन चाचणीचा निकाल त्यांना सार्वजनिक करता येणार नाही.
सर्व मार्गदर्शक तत्त्वे येथे डाउनलोड करा
केंद्र सरकारने जारी केलेली हे सर्व मार्गदर्शक तत्त्वे तुम्ही खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन PDF फाईल मध्ये बघू शकता किंवा त्या फाईलला तुम्ही डाउनलोड करू शकता.
Download Coaching Centers New Guideline 2024 here: Guideliens_Coaching_Centres_en.pdf (education.gov.in)
उल्लंघन केल्यास मोठा दंड
कोचिंग सेंटरने मार्गदर्शक तत्त्वांनुसार नोंदणी न केल्यास आणि अटी व शर्तींचे उल्लंघन केल्याबद्दल त्या कोचिंग सेंटर्सना मोठा दंड भरावा लागेल. पहिल्यांदा उल्लंघनासाठी 25,000 रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघनासाठी 1 लाख रुपये दंड आणि तिसऱ्यांदा उल्लंघन केल्यास त्या कोचिंग सेंटरची नोंदणी रद्द होण्यासोबतच मोठा दंड भरण्यासाठी सुद्धा कोचिंग सेंटरला तयार राहावे लागेल.
आत्महत्या रोखण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव
कोचिंग सेंटर्सची नोंदणी आणि नियमन 2024 साठी मार्गदर्शक तत्त्वे आधीच राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आली आहेत. काही राज्यांमध्ये आधीच कोचिंग संस्थांच्या नियमनाशी संबंधित कायदे आहेत. भरमसाठ फी आकारणाऱ्या खाजगी कोचिंग सेंटर्सची वाढती संख्या आणि आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना केंद्र सरकारने ही मॉडेल मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
अलीकडे कोटाच्या कोचिंग मार्केट आणि इतर मोठ्या केंद्रांमध्ये इंजिनीअरिंग आणि वैद्यकीय परीक्षांची तयारी करणाऱ्या मुलांनी आत्महत्या केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. काही पालक आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात पाठवण्यात आला आहे. असेच एक पालक अनिरुद्ध नारायण यांनी कोटामधील तरुणांच्या आत्महत्या रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांबाबत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. 2023 मध्ये एकट्या कोटामध्ये 26 आत्महत्या झाल्या आहेत. संसदेत चर्चा आणि प्रश्नांच्या माध्यमातूनही हे मुद्दे अनेकदा मांडले गेले आहेत.
या सर्व कारणांमुळेच आता अखेर केंद्र सरकारने कोचिंग सेंटरसाठी तपशीलवार नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. (Coaching Centers New Guideline 2024 Coaching of children below 16 years is closed).