Usha Nadkarni: प्रेक्षकांच्या लाडक्या आऊ म्हणजेच मराठीसह हिंदी मनोरंजन विश्वात अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या अलीकडेच ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ या कार्यक्रमात झळकल्या होत्या. ‘बिग बॉस मराठी’सारखा रिॲलिटी शोदेखील त्यांनी गाजवला होता.
अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये बिग बॉस मराठी या शो विषयी भाष्य केले. त्यांनी हा कार्यक्रम करणे, त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचेही म्हटले. Usha Nadkarni यांनी असेही म्हटले की, हा शो केल्यानंतर मी वेड्यासारखे वागायचे.
उषा नाडकर्णी या ‘बिग बॉस मराठी 1’मध्ये सहभागी झाल्या होत्या. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बिग बॉस शो बद्दलच्या या अनुभवाविषयी सांगितले. त्या म्हणाल्या की, “बिग बॉसमधील ते 77 दिवस, मी वेडी झाले होते. तिथे डोक्याला मुंग्या यायच्या. बाकी लोकांचं माहीत नाही, पण माझ्या डोक्याला मुंग्या आल्या होत्या.” त्यांनी असेही म्हटले जेव्हा त्या शोमधून बाहेर पडल्या, तेव्हा त्यांच्या मनात असंख्य सवाल घेऊन त्या घरी पोहोचल्या होत्या.
उषा यांनी पुढे म्हटले की, “घरी आल्यानंतर मी लगेचच विचारले… मी दरवाजात उभी होते. भावाने दरवाजा उघडला, तर मी त्याला विचारले की हा हॉल छोटा का झाला आहे? भाऊ म्हणाला ‘छोटा कुठे आहे? तू आत ये, तिथे मोठ्या घरात राहून आल्यानंतर तुला हे सगळं आता लहान वाटतंय.”
उषा यांनी असंही सांगितलं की, शोमध्ये राहून आल्यानंतर त्यांना अनेक गोष्टींचे विस्मरण झाले होते. याविषयी त्या म्हणाल्या की, “घरी आल्यानंतर मला माझा टेलिफोन क्रमांक लक्षात नव्हता, फोन लावणं वगैरे, सगळं विसरले होते. कारण जगाशी तुमचा काहीही संपर्क राहत नाही.”
उषा नाडकर्णी यांनी पुढे म्हटले की, “बिग बॉस च्या घरात सगळे वेड्यासारखे असतात. माझा अनुभव खूप वाईट होता. परत बोलावलं तर जाणार नाही, तिथेच नमस्कार करुन परत येईन.”
अभिनेत्री उषा या ‘बिग बॉस मराठी 1’च्या घरात 77 दिवस टिकून राहिल्या होत्या. महेश मांजरेकर यांनी होस्ट केलेले BBM चे हे पर्व अभिनेती मेघा धाडे हिने जिंकले होते.