Premachi Goshta End: ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका बंद होत आहे, या मालिकेचं शेवटचं शूटिंग आता पूर्ण झालं आहे, यामुळेच या मालिकेत झळकणाऱ्या कलाकारांनी सोशल मिडीयावर भावूक पोस्ट शेअर केल्या आहे.
४ सप्टेंबर २०२३ रोजी ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानने छोट्या पडद्यावर दमदार पुनरागमन केलं होतं. तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग असल्यामुळेच ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली होती. टीआरपीच्या शर्यतीतही ही मालिका कायम टॉप-५ मध्ये असायची,
पण पुढे ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर या मालिकेचा टीआरपी कमी झाला आणि त्यानंतर मालिकेची वेळही बदलली, यामुळे TRP वर खूप मोठा परिणाम झाला. आणि आता ही मालिका बंद होत आहे.
या मालिकेत ‘सागर कोळी’ ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राज हंचनाळेने यासंदर्भात आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामुळे मालिकेचा शेवट कसा होणार याची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

राजने शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याने मालिकेच्या स्क्रिप्टचा फोटो पोस्ट केला आहे. या स्क्रिप्टनुसार, मालिकेचा शेवट खूपच भावनिक आणि प्रेमळ असणार आहे. यामध्ये सागर मुक्ताला म्हणतोय की, “तुमच्यामुळे घराला, मला पूर्णत्व मिळालं.” आणि त्यानंतर मुक्ता प्रेमाने सागरचा हात हातात घेणार आहे. दोघांमध्ये प्रेमळ संवाद होऊन या मालिकेचा शेवट गोड होणार आहे. राजने शेअर केलेल्या स्क्रिप्टच्या फोटोच्या शेवटी “समाप्त…अंत: अस्ति प्रारंभ” म्हणजे ‘शेवट: हाच तर सुरुवात आहे’ असं लिहिण्यात आलं आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत सावनी या खलनायिकेचं पात्र साकारून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने मालिका संपताना इन्स्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने शूटिंगच्या आठवणी, सेटवरचे फोटो आणि आपल्या मनात दाटलेल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे. अपूर्वाने लिहिलं आहे की, हा दोन वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता, पण तो अजिबात सोपा नव्हता. या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यातच त्यांची खरी परीक्षा होती.
अपूर्वा आपल्या पोस्टमध्ये लिहिते, “प्रेमाची गोष्ट’ मालिकेचं शेवटचं शूटिंग पूर्ण झालं. खरंतर, कसं व्यक्त होऊ हे कळत नाहीये…कारण, माझ्या मनात आता असंख्य भावना दाटून आल्या आहेत. जवळजवळ दोन वर्षांचा हा प्रवास होता. अनेक आव्हानं, नव्या गोष्टी शिकण्याची संधी आणि आयुष्यात आलेल्या सुंदर अनुभवांनी परिपूर्ण असा हा प्रवास होता. शेवंताची भूमिका ते सावनी…हा प्रवास एक अभिनेत्री म्हणून देखील खूप काही शिकवून गेला.”
या दोन वर्षांच्या प्रवासात आलेल्या अनुभवांबाबतही अपूर्वा मोकळेपणाने बोलली. “हा २ वर्षांचा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. आम्ही सुद्धा कठीण काळ अनुभवला आहे. पात्र बदलली, काही कलाकार मध्येच सोडून गेले, सतत होणारे बदल या सगळ्या परिस्थितीत आम्ही खचलो नाही. ती आमची एकप्रकारे परीक्षाच होती,” असं अपूर्वाने नमूद केलं.
कितीही अडचणी आल्या तरी, काम करतानाचा उत्साह, धमाल आणि मजा यामध्ये कोणतीच कमी भासू दिली नाही, याची काळजी घेतल्याचं तिने सांगितलं. कामाप्रती असलेली कमिटमेंट आणि संपूर्ण टीमच्या साथीने उभं राहणं हे एका कलाकार म्हणून खूप महत्त्वाचं असतं, असं ती म्हणाली.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका संपल्यानंतर, ७ जुलैपासून समृद्धी केळकरची ‘हळद रुसली, कुंकू हसलं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेतेय.. यातले तुमचे आवडते पात्र कोणते होते? ते खाली कमेंट करून सांगा.