Pahalgam Attack: काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी पर्यटक निसर्गाचा आनंद घेत असतानाच अचानक गोळीबाराचा आवाज आला आणि हे खोरं किंकाळ्यांनी भरून गेलं. निरपराध पर्यटकांना घेरून, त्यांचा धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पेक्षा जास्त लोक ठार झाले असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. या नृशंस हल्ल्यात बळी पडलेल्यांपैकी एक म्हणजे पुण्यातील कौस्तुभ गनबोटे. कुटुंब आणि मित्रासह काश्मीर फिरायला गेलेले कौस्तुभ आणि त्यांचा मित्र संतोष जगदाळे या दोघांनाही दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केलं.
आज पहाटे जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे यांचा मृतदेह पुण्यातील निवासस्थानी आणण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी गनबोटे यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतलं. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केलं. त्यावेळी कौस्तुभ यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर दहशतवागी हल्ल्याचा भयानक अनुभव सांगितला. आपल्या पतीची आपल्याच डोळ्यांसमोर हत्या झाली हे सांगताना त्यांना शब्दच फुटत नव्हते. तिथे नेमकं काय घडलं हे त्यांच्या तोंडून ऐकताना सगळ्यांच्यांच अंगावर काटा आला. दहशतवाद्यांच्या क्रूरपणामुळे गणबोटे यांच्या घरातील आधार हरवला.
शरद पवार यांनी गणबोटे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांच सांत्वन केलं. सर्व घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांच्या समोर अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या की “आम्ही पहलगामला फिरायला गेलो होतो, तेवढ्यात तिथे हे बंदुकधार दहशतवादी आले. माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या गेल्या. आम्हाला अजान म्हणा असं सांगण्यात आलं होतं. ते ऐकून तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्या अजान म्हणायला सुरूवात केली, पण अतिरेक्यांनी तिथे उभ्या असलेल्या सगळ्या पुरूषांना मारू टाकलं. आमच्या देखतंच त्यांना गोळ्या घातल्या.”
“माझे मिस्टर तिथे उभे होते, त्यांचा मित्र बाजूला होता, त्यालाही पुढे बोलाववून घेतलं आणि विचारलं ‘अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?’ त्यांच बोलणं ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो, पण तरीही त्यांनी सर्वांना मारून टाकलं.”
“तिथे गेटवर एक मुस्लिम होता तो म्हणत होता तुम्ही कशाला निरपराध लोकांना मारता त्यांनी काय चुकी केली आहे? असं विचारलं. दहशतवाद्यांनी त्याला सुद्धा पुढे बोलावलं आणि गोळ्या घातल्या.”
“ते गेल्यावर आम्ही तिथून पळत सुटलो, आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. खाली येताना आमचे गुडघ्यापर्यंतचे पाय चिखलात रुतत होते, पण आम्ही पळत सुटलो तिकडून कसेबसे. पण आमचे घोडेवाले खूप मुस्लिम होते, पण ते खूप चांगले होते. हल्ला झाल्यानंतर ते आम्हाला घ्यायला आले परत, आम्ही जो ड्रायव्हर केला होता, त्यानेही आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली. तो पण ढसाढसा रडला.” असा भयानक अनुभव कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने सांगितला.
पहलगाम हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
1) अतुल मोने – डोंबिवली
2) संजय लेले – डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल