Prajakta Mali: आमदार सुरेश धस विरोधात अभिनेत्री प्राजक्ताला गौतमी पाटीलची साथ – ताई, आम्ही सर्व तुझ्याबरोबर

Prajakta Mali:

Prajakta Mali: बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर टीका करत असताना अभिनेत्री प्राजक्ता माळींसह इतर दोन अभिनेत्रींची नावं घेतली. सुरेश धसांच्या विधानामुळे उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. अगोदरच करुणा शर्मा यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीचे नाव घेत तिचे धनंजय मुंडे सोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे काही सोशल मिडिया युजर कडून या प्रकरणाची खरी माहिती न घेता सोशल मिडीयावर अभिनेत्री प्राजक्ताची खूपच बदनामी करण्यात आली होती. त्यातच आता आमदार सुरेश धस यांचेही वक्तव्य आल्याने अभिनेत्री प्राजक्ता प्रचंड संतापली.

या प्रकरणावर प्राजक्ता माळीने २८ डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन सुरेश धस यांच्या वक्तव्याचा निषेध केला. सुरेश धसांच्या विधानामुळे झालेला त्रास तिने माध्यमांसमोर सांगितला. तसंच त्यांनी जाहीरपणे आपली माफी मागावी, असं प्राजक्ता माळीने म्हटलंय. यावेळी प्राजक्ता सोबत तिचे आई आणि भाऊही उपस्थित होते. पत्रकारांशी बोलत असतांना प्राजक्ता माळीचा कंठ दाटून आला आणि तिला अश्रू अनावर झाले. तिला होणारा त्रास बघून तिच्या आईच्याही डोळ्यांत अश्रू आले. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांनी केलेल्या टिका-टिपण्णीला गांभीर्याने घेत महिला आयोगाकडे त्यांची तक्रार दाखल केली आहे.

पण आमदार सुरेश धस अजूनही त्यांच्या वक्तव्यावर ठाम आहे, त्यांनी प्राजक्ताची माफी मागण्यास नकार दिला आहे. या संपूर्ण प्रकरणावर डान्सर गौतमी पाटीलने हिनेही तिची प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या भूमिकेला गौतमी पाटीलने समर्थन दिले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना डान्सर गौतमी पाटील म्हणाली, “प्राजक्ता ताई, आम्ही सर्व कलाकार तुझ्याबरोबर आहोत. या गोष्टीवरून ट्रोल जरी केलं तरी लक्ष देऊ नकोस. तू पत्रकार परिषदेत जे काही बोलली ते मी मगाशी ऐकलं. तू जे काही बोलली ते सगळं बरोबर होतं. मी एक कलाकार आहे, तर माझी एक विनंती आहे, कलाकाराला कलाकाराच्या जागेवर राहू द्या. त्याला कुठल्याही नेत्याबरोबरच नाही, तर कोणाहीबरोबर त्या कलाकाराचं नाव जोडू नका. कलाकाराचं दुःख हे कलाकाराचं माहीत असतं.”

“आज कोणाला त्रास होतोय हे तुम्हाला माहीत नाही. आज त्या व्यक्तीलाच माहीत आहे. मला खूप ट्रोल केलं गेलं. बऱ्याच गोष्टींना मी ट्रोल झाली. पण माझा त्रास मलाच माहीत, लोकांना माहीत नाही. लोक आपापल्या घरात राहतात, ट्रोल करतात. जे चुकीच आहे. म्हणून प्लीज कोणाबरोबरही कोणाच नाव जोडू नका. कलाकाराला पाठिंबा द्या. त्याच्याबरोबर उभे राहा. जसं प्रेक्षक वर्ग आम्हा कलाकारांवर प्रेम करतात, तसंच प्राजक्ता ताईवर बरेच प्रेक्षक प्रेम करतात, म्हणून या गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. आम्ही सगळेजण तुझ्याबरोबर आहे. अशीच तू पुढे जा, हसत राहा आणि खूप छान राहा.”

याप्रकरणावरून प्राजक्ता माळी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहे. यावेळी सुरेश धस यांनी केलेले आरोप याची वस्तूस्थिती मुख्यमंत्र्यांसमोर मांडून कठोर कारवाई करण्याची मागणी असल्याचं प्राजक्ताने पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याची माहिती प्राजक्ताने दिली. याशिवाय करुणा मुंडे यांनी केलेल्या आरोपांवर देखील अभिनेत्रीने आपलं मत मांडलं. “तुम्ही महिला आहात. तुम्ही महिलांना होणारा त्रास समजू शकता. त्यामुळे इथून पुढे तुम्ही कोणत्याही गोष्टीची खातरजमा केल्याशिवाय वक्तव्य करणार नाहीत, अशी खात्री बाळगते”, असं प्राजक्ता म्हणाली.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top