Ladki Bahin Yojana: राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप देखील जाहीर झालं. यातच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन देखील पार पडलं. मात्र, सरकार स्थापन होऊन आज जवळपास १८ दिवस झाले आहेत. तरीही अद्याप लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? याबाबत आता राज्यभरातून प्रश्न विचारले जात आहेत. या पार्श्वभूमीवरच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता पुढील सात ते आठ दिवसांत देण्यात येणार आहे.”
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना देण्यात येणाऱ्या १५०० रुपयांच्या हप्त्यात वाढ करून २१०० रुपये करण्यात येतील, अशी घोषणा केली होती. मात्र, आता सरकार स्थापन होऊन एवढे दिवस झाले तरी लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही. डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? आणि नेमकं किती मिळणार? याबाबत ‘लाडक्या बहिणी’मध्येही संभ्रम असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना वाढीव २१०० रुपये हफ्ता हा बजेट नंतर मिळणार आहे, म्हणजेच आता महिलांना या वाढीव हफ्त्यासाठी अजून काही दिवस वाट बघावी लागेल.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये विविध विषयांची माहिती देताना लाडकी बहिण योजनेसंदर्भात महत्त्वाची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अनेक योजना जाहीर केल्या होत्या. या योजनांची पूर्तता करण्यासाठी ३५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ हजार ४०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली होती.
यासोबतच अधिवेशन संपताच डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात पाठवला जाईल असे फडणवीस अधिवेशनात म्हणाले होते, पण आता मिडिया समोर मात्र त्यांनी डिसेंबरचा हप्ता पुढील सात ते आठ दिवसांत पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याची अजूनही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. पण डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हफ्ता मिळण्याची शक्यता आहे.