बुक्कीत टेंगूळ आणि गुलीगत धोका देत झापुक झुपुक सूरज चव्हाण बिग बॉसचा विजेता | Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan

Bigg Boss Marathi 5

Bigg Boss Marathi 5 Winner Suraj Chavan: गेल्या 70 दिवसांपासून बिग बॉस मराठी सीजन 5 च्या घरात रंगलेला खेळ आता संपला असून सगळ्यांना बुक्कीत टेंगूळ देऊन बारामतीचा सूरज चव्हाण विजेता ठरला. गायक असलेला अभिजीत सावंत दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ज्याला गेम कळत नाही अशी टीका होत असलेल्या सूरज चव्हाणने त्याची पॉवर दाखवली आणि बिग बॉस जिंकत बक्कळ कमाई केली. सूरज चव्हाणवर आता लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव झाला. इतकंच नव्हे तर दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला घेऊन एक चित्रपट करणार असल्याची घोषणाही केली. अर्थात हा काही सूरजचा पहिलाच चित्रपट नसेल तर बिग बॉसच्या घरात येण्याअगोदरच सुरजने चित्रपटांत काम करणे सुरु केले आहे.

खरंतर सूरज चव्हाण हा बिग बॉस मध्ये येण्यास फारसा उत्सुक नव्हता, पण बिग बॉसच्या टीमने शेवटी त्याला घरामध्ये आणले. त्यानंतरही सूरज चव्हाण अडखळताना दिसला. सूरज चव्हाणला गेम समजत नाही अशी टीकाही त्याच्यावर होत होती. पण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी भरभरून दिलेल्या पाठिंब्यावर सूरज चव्हाणने अखेर बिग बॉसच्या पाचव्या सीजनच्या ट्रॉफीवर त्याचं नाव कोरलं.

मूळचा बारामतीचा असलेला सूरज चव्हाण हा सुरुवातीला टीकटॉकमुळे आणि नंतर Instagram रील्स तसेच YouTube shorts व्हिडीओ मुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. सूरजचं वैयक्तिक आयुष्य हे फार खडतर गेलंय. सूरज लहान असतानाच त्याच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतला. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेता आलं. सूरजला पाच बहिणी असून त्याच्या मोठ्या बहिणीने सूरजचा सांभाळ केला.

बुक्कीत टेंगूळ, गुलीगत धोका, झापुक झुपुक, अशा त्याच्या शब्दांमुळे आणि रील्समुळे सूरज (Suraj Chavan) चांगलाच फेमस झाला. त्यानंतर त्याला बिग बॉस मराठीची ऑफर देण्यात आली. सुरुवातीला सूरज बिग बॉसच्या घरात यायला तयार नव्हता असं अनेकदा बिग बॉसच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. पण शेवटी बिग बॉसच्या टीमने त्याला घरात येण्यासाठी तयार केलं. त्यानंतर आता सूरजने थेट बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.

बिग बॉस मराठीचा रनर अप अभिजीत सावंतला (Abhijeet Sawant) पु. ना. गाडगीळ यांच्याकडून एक लाख रुपयांचा चेक देण्यात आला. तसेच इतर स्पर्धक असलेले धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले.

या स्पर्धेतील टास्क क्वीन अशी ओळख असलेल्या जान्हवी किल्लेकरने मात्र इतरांच्या तुलनेत चांगले पैसे कमावले. पहिल्या सहा स्पर्धकांमध्ये असलेल्या जान्हवीने अंतिम स्पर्धा सुरू व्हायच्या आधी पैसे घेऊन बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये तिला तब्बल 9 लाख रुपये मिळाले. जान्हवी ही सहाव्या क्रमांकावर राहिली होती, त्यामुळे तिने पैसे घेण्याचा निर्णय तिच्यासाठी योग्य ठरला.

सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठी सीजन 5 चा विजेता ठरला आहे. त्याबद्दल त्याचे हार्दिक अभिनंदन, तर मंडळी तुमचाही सुरजलाच सपोर्ट होता का? किंवा तुमच्या मते या सीजनचा विजेता कोण असायला पाहिजे होता? याबद्दल तुमचे मत काय? ते येथे खाली कमेंट करून नक्की सांगा.

Share this Post:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top