Ravindra Mahajani: दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाला आता काही महिने झाल्यानंतर त्यांची पत्नी माधवी यांनी ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. यात माधवी यांनी जुन्या आठवणी शेअर करत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्याबद्दल अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. (Ravindra Mahajani wife Madhavi about his gambling addiction)
माधवी महाजनी यांनी त्यांच्या या पुस्तकात रवींद्र महाजनी यांना व्यसन आणि त्यांना जुगाराचा नाद असल्याचे लिहिले आहे. तसेच रवींद्र महाजनी हे पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करत, त्यांचा रागट स्वभाव अशा अनेक गोष्टींचा खुलासा माधवी यांनी त्यांच्या पुस्तकात केला आहे. तसेच रवींद्र महाजनी हे जुगारात लावण्यासाठी घरातले दागिने घेऊन जात असंही माधवी यांनी या पुस्तकात लिहिले आहे.
माधवी महाजनी यांनी त्यांच्या ‘चौथा अंक’ या पुस्तकात लिहिलंय की “रवीला घरी यायला उशीर झाला की, मला भीती वाटायची, मी कपाट उघडून बघायची. एखादा तरी दागिना कमी झालेला असायचा. एकदा असंच जेव्हा माझ्या लक्षात आलं, तेव्हा मला घरात बसणं अशक्य झालं. मी उठले आणि तो जिथे जुगार खेळायला जायचा तिथले अड्डे शोधू लागले. एका जुगाराच्या अड्ड्यावर मला त्याची गाडी दिसली. मी सरळ जिना चढून वर गेले. काचेतून मला तो दिसला. मला पाहताच तो बाहेर आला. हाताला धरून मी त्याला घरी घेऊन आले. पण हे नेहमीच कसं शक्य होणार. मी त्याला थांबवू शकत नव्हते. मला म्हणायचा, ‘मी जेवढे दागिने जुगारात हरलो, ते सगळे मी जुगारातच जिंकून आणेन.’ पण ते कधीच झालं नाही. रवीला जे काही पैसे मिळत ते तो माझ्याकडे द्यायचा. त्याला हवे असले की मागून घ्यायचा. त्याचा हेतू वाईट नव्हता पण पुन्हापुन्हा तो त्याच चुकीच्या मार्गानं पैसे मिळवायला जायचा.” असा खुलासा माधवी यांनी केला आहे.
तसेच रवींद्र महाजनी हे पत्नी माधवीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचे, याबद्दल माधवी यांनी लिहिले आहे की “पुण्याला आल्यावर वानखेडे स्टेडियमच्या अनुभवावर तेव्हा मला मोठ्या हॉटेलमधे चांगली नोकरी मिळू शकत होती. पण रवीचा स्वभाव संशयी असल्याने मी रात्रीच्या वेळात ड्यूटी करण्याचे टाळले. काही काळ मी नऊ ते पाचवाली नोकरी चांगल्या हॉटेलमधे केली.” असं माधवी यांनी या पुस्तकात लिहिले आहे.

‘चौथा अंक’
माधवी रवींद्र महाजनी यांचे आत्मचरित्र