स्टार प्रवाह वरील 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या खऱ्या आईचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.

गुरुवारी, 16 नोव्हेंबर रोजी तेजश्रीच्या आई 'सीमा प्रधान' यांनी मुंबईत त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

सीमा प्रधान या गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी होत्या. या गंभीर आजारपणामुळेच त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे.

त्यांच्या निधनामुळे अभिनेत्री तेजश्रीला आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या अनेक कार्यक्रमांत तिची आई सीमा प्रधान तिच्या सोबत असायच्या.

तेजश्रीच्या आईला आपल्या लेकीच्या कामाचं खूप कौतुक होतं. दोन महिन्यांपूर्वी तेजश्रीच्या 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या स्पेशल स्क्रीनिंगला त्या हजर होत्या.

त्यावेळी तेजश्रीची आई म्हणाली होती की "आतापर्यंत तेजश्रीने विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.

तिची 'अग्गबाई सासूबाई' मधील भूमिका मला फार आवडली. माझं असं नेहमी म्हणणं असतं की अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा,

सहन करत राहू नये. ती तिची भूमिका तशी होती. तर या नवीन मालिकेतही पुढे तशीच होताना दिसेल.

आम्ही तिचं काम पाहिलं आहे आणि आवडलं आहे." असं तेजश्रीच्या आई सीमा प्रधान म्हणाल्या होत्या.

अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आई सीमा प्रधान यांना भावपूर्ण श्रद्धांजली.