महाराष्ट्रात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरीची फायनल लढत पुणे जिल्ह्याच्या फुलगाव येथे 'सिकंदर शेख आणि गतवर्षीचा विजेता शिवराज राक्षे' यांच्यात झाली.

गेल्यावेळी थोडक्यात महाराष्ट्र केसरी पद हुकलेल्या सिकंदर शेख याने अवघ्या 10 सेकंदात शिवराज राक्षे याला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा आणि महिंद्रा थार गाडी आपल्या नावावर केली.

लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्याच स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळविला.

सिकंदर शेख याने गतवर्षीचा खरा विजेता मीच होतो असं सांगत म्हटलंय की "यावर्षी मी गेली सहा-सात महिने पुर्ण तयारी करून महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला.

याचं खरं श्रेय माझे वडील आणि कोच यांना जातं. मागील वर्षी वाद खोटा उठवला होता. त्यावेळीही मीच खरा विजेता होतो." असं महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने सांगितले.

22 वर्षांचा सिकंदर शेख कोल्हापुरातल्या गंगावेश तालमीतला पैलवान आहे.

सिकंदरचं मूळ गाव हे सोलापूर जिल्ह्यातलं मोहोळ गाव. त्याचे आई वडील आणि मोठा भाऊ अजूनही तिथेच राहतात. सिकंदरच्या कुस्तीची तालीम मोहोळमधूनच सुरू झाली.

सिकंदरचे वडील रशिद शेख स्वत: पैलवान होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते हमाली काम करु लागले.

सिकंदर तालमीत असताना त्याच्या कुटुंबाची परिस्थिती तेव्हाही हलाखीची होती. त्याचे आई-वडील स्वत:चं पोट मारुन सिकंदरला खुराक द्यायचे.

वडिलांना हमालीतून रोजचे जे शंभर-दोनशे रुपये सुटायचे त्यातले पैसे ते सिकंदरला खुराक साठी द्यायचे.

कुस्तीच्या स्पर्धांमधला विजयाच्या मालिकेमुळे सिकंदरच्या घराची आर्थिक परिस्थितीसुद्धा बदलून आता चांगली झाली आहे.

आता तर सिकंदरने 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा सुद्धा जिंकली आहे. याबद्दल त्याचे खूप अभिनंदन.